सायन-पनवेल महामार्गावर कर्नाळा अकादमी आणि खांदेश्वर गावाकडे जाण्यासाठी असणारे बेकायदा वळण कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. या बेकायदा वळणामुळे अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत. हे वळण बंद करण्यासाठी वाहतूक विभागाने राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पत्रव्यवहार केला आहे.
खांदेश्वर गाव आणि कर्नाळा अकादमीकडून येणारी वाहने पनवेलच्या दिशेकडे जाताना या बेकायदा वळणाचा वापर करतात. वाहतूक विभागाने गणेशोत्सवामुळे सध्या या वळणाला लोखंडी ड्रम लावले आहेत. या चुकीच्या वळणामुळे झालेल्या अपघातांत पाच जणांनी जीव गमावले आहेत, तर २० अपघातांमध्ये १८ जण जबर जखमी झाल्याची नोंद आहे. कर्नाळा अकादमीतून पनवेलकडे जाणारी वाहने सर्रास याच बेकायदा मार्गाचा उपयोग करतात. वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाई होते, मात्र कारवाई थांबल्यानंतर पुन्हा या वळणाचा वापर सुरू होते.
पनवेलच्या वाहतूक विभागाचे नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब गाडे यांनी याची दखल घेत हे धोकादायक वळण कायमस्वरूपी बंद करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. रस्ते विकास मंडळाच्या मुख्य कार्यालयाला संरक्षित पट्टी लावून हे वळण तात्काळ बंद करण्याच्या सूचना  गाडे यांनी दिल्या आहेत. हे वळण बंद केल्यास कर्नाळा अकादमीमधून बाहेर पडणाऱ्या वाहनांसाठी तसेच खांदेश्वर गावातील वाहनांसाठी असलेला सिडकोचा रस्ता चांगल्या दर्जाचा करा व नंतरच हे वळण बंद करा, अशी मागणी पनवेल नगर परिषदेचे बांधकाम सभापती मनोहर म्हात्रे यांनी केली आहे. नगराध्यक्षा चारुशिला घरत व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांच्याकडे हा रस्ता दुरुस्त करण्याची त्यांनी मागणी केली आहे. व्यवस्थापकीय संचालक भाटीया यांनी नोव्हेंबरमध्ये या रस्त्याचे दुरुस्ती काम सुरू होईल, असे आश्वासन दिले आहे.