10 December 2018

News Flash

पालिकेची बेकायदा भाजी मंडई

मंडईचे बांधकाम सात दिवसांत तोडून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी पत्र सिडकोने पालिकेला दिले आहे.

नेरुळमध्ये अधिकाऱ्यांचा प्रताप; सात दिवसांत बांधकाम तोडण्याचे सिडकोचे पालिकेला पत्र

नेरुळ सारसोळे सेक्टर-६ मधील भूखंड क्रमांक-११ वर बाजारासाठी आरक्षित असलेला भूखंड सिडकोकडून नवी मुंबई पालिकेला हस्तांतरित झाला नसताना पालिकेने तिथे लाखो रुपये खर्चून ‘जय दुर्गामाता भाजी मंडई’ उभारली आहे. मंडईचे बांधकाम सात दिवसांत तोडून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी पत्र सिडकोने पालिकेला दिले आहे.

सिडकोने नवी मुंबई पालिकेकडे विविध सामाजिक सेवेसाठी आरक्षित भूखंड हस्तांतरित केले आहेत. यात शाळा, मैदाने, उद्याने, शौचालय, समाजमंदिर आणि भाजी मंडई सामाजिक सेवा संस्थांना भूखंड पालिकेला दिले आहेत. पालिकेने आणखी काही भूखंडांची मागणी सिडकोकडे केली आहे. सामाजिक सोयीसुविधांचे भूखंड वगळता विक्रीयोग्य भूखंडांचे अधिकार सिडकोने स्वत:कडे ठेवले आहेत.

मात्र सारसोळे येथे पालिकेने बांधलेल्या मंडईत ३० ओटे तयार करण्यात आले आहेत. या मंडईचे उद््घाटन झाले आहे.

परंतु दोन वर्षांनंतही या ठिकाणी बनवलेली भाजी मंडई वापराविना पडून आहे. या ठिकाणी वीजव्यवस्था नसल्याने मंडई गर्दुल्ल्यांचा अड्डा बनली आहे.बेकायदा मंडईचे बांधकाम सात दिवसांत पाडून पालिकेने अहवाल सादर करण्याचे पत्र सिडकोने सप्टेंबरमध्येच दिले आहे. यावर पालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही.

याबाबत पालिकेचे अनेक अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सिडकोचे पत्र मिळाले आहे. या ठिकाणी २०१३-१४ च्या काळातच भाजी मंडई उभारली आहे. पालिकेचा नगररचना, मालमत्ता, अभियंता विभाग यांची बैठक घेऊन भाजी मंडईवरील कारवाईबाबतही निर्णय घेतला जाईल.

रामास्वामी एन. पालिका आयुक्त

सिडको जर पालिकेला हे काम बेकायदा असून तोडण्याचे पत्र देते, तर पालिकेने ते डोळे झाकून का केले? संबंधित पालिका अधिकारी याला जबाबदार आहेत. पालिका नागरिकांच्या पैशाचा दुरुपयोग करीत आहे.

प्रल्हाद पाटील

या ठिकाणची जागा सिडकोने धोकादायक दत्तगुरू सोसायटीला देण्याचे मान्य केले असताना याबाबत टाळाटाळ का करीत आहे.  या इमारतीत कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी पालिकेची राहील.

सूरज पाटील, नगरसेवक

First Published on December 30, 2017 1:31 am

Web Title: illegal vegetable market