नवी  मुंबईत  करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून, मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत.  शहरात आज ३१३नवे रुग्ण वाढले असून, करोनाबाधितांची शहरातील एकूण संख्या ९ हजार ४४५ झाली आहे. शहरात आज ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३०३ झाली आहे.  शहरात आतापर्यत तब्बल ५ हजार ६५२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

नवी मुंबई शहरात करोनाचा कहर सुरुच असून दररोज करोना रुग्णसंख्येत भर पडत असल्याने, नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात ३ जुलैच्या मध्यरात्रीपासून १३ जुलैच्या मध्यरात्री पर्यंत १० दिवसाचा लॉकडाउन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हा लॉकडाउन १९ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी जाहीर केलेला आहे.

शहरात १३ जुलैपर्यंत टाळेबंदी असताना दुसरीकडे करोनाबाधितांची संख्याही वाढतच चालली आहे. ठाणे  व इतर महापालिकांनी ८ दिवस टाळेबंदी वाढवली असून १९ जुलैपर्यंत टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचधर्तीवर नवी मुंबई शहरातही टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच असला, तरी देखील करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे दिसत आहे. राज्यातील करोनामुक्त रुग्ण संख्या आता दीड लाखाच्या उंबरठ्यावर आली असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यात आज ३ हजार ३४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्के असून, आतापर्यंत  राज्यात १ लाख ४० हजार ३२५ जणांनी करोनावर मात केली आहे.  दरम्यान, सध्या राज्यात १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे.

मागील २४ तासांत राज्यभरात ७ हजार ८२७ नवे करोना रुग्ण आढळले तर १७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ५४ हजार ४२७ वर पोहचली आहे. तर, १० हजार २८९ जणांचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४ टक्के एवढा आहे.