स्कूलबस चालकाला अटक
खांदेश्वर वसाहतीमधील न्यू होरायझन विद्यालयाच्या छोटय़ा शिशू वर्गातील एका बालिकेशी शाळेच्या चालकाने अश्लील चाळे केल्याचे उघड झाल्यानंतर पालकवर्गात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी घडली. या घटनेत संशयीत आरोपी म्हणून अटक केलेल्या रझाक पठाण याला अटक करण्यात आली असून त्याला १९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र पठाण व शाळेत काम करणारे १६ चालक आणि वाहतूक व्यवस्थेशी निगडित असलेल्या २४ कर्मचाऱ्यांची पोलीस चारित्र्य पडताळणी (पीसीसी) शाळा व्यवस्थापनाने न केल्याचे उघड झाले आहे. यामुळे या प्रकाराला अप्रत्यक्षपणे शाळेचे व्यवस्थापन जबाबदार असल्याची चर्चा आहे.
अनेक बसचालक, वाहक व मदतनीस यांची चारित्र्य पडताळणी करण्याचा नियम नसल्याने न्यू होरायझन शाळेच्या व्यवस्थापनाने १६ बस चालविणाऱ्या १७ चालक, १७ बस क्लीनर आणि ७ महिला मदतनीसांची चारित्र्य पडताळणी केलेली नाही. रझाक हा गेल्या दोन महिन्यांपासून चालकाचे काम करत असून सोमवारी ही मुलगी ज्या बसमधून शाळेत आली त्यावेळी बसमध्ये महिला मदतनीस नव्हती, असे समजते. याच वेळी हा प्रकार झाल्याची शक्यता आहे.
न्यू होरायझन शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका गोळे यांनी सोमवारच्या घटनेची पोलीस चौकशी करत असल्याचे सांगितले, तसेच हा चालक दोषी असल्यास त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, लवकरच विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करून घेण्यात येईल, असे त्या म्हणाल्या. या घटनेनंतर खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांनी न्यू होरायझन पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापनाला कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बैठका निष्फळ
याच शाळेतील गौरव कंक या विद्यार्थ्यांने २४ फेब्रुवारीला शाळेच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून आत्महत्या केली होती. यानंतर शाळांमधील विद्यार्थी किती सुरक्षित आहेत याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा शिक्षण विभागाने शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व मुख्याध्यापकांसोबत बैठका घेतल्या. या बैठकीत नेहमीप्रमाणे अनेक विषयांवर चर्चा झाली. मात्र सोमवारी घडलेल्या या प्रकारानंतर या बैठकींतील फोलपणा सिद्ध झाला आहे. पनवेल तालुक्यामध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ४८३ मोठय़ा तर ३४० लहान बस धावतात.