रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी मुंबईत सरासरी ६६ तर नवी मुंबई ८० दिवसांवर पोहोचला असताना शेजारील पनवेल महापालिका हद्दीत मात्र तो अजूनही ४४ दिवसांवरच आहे. तसेच मृत्युदरही दुप्पट आहे. त्यामुळे पनवेलमधील परिस्थिती ही चिंताजनक आहे. असे असताना पालिका प्रशासन चांगल्या आरोग्य सेवांवर भर देण्यापेक्षा क्रिकेट संकुल उभारण्यावर अधिक लक्ष देत आहेत. याबाबत पनवेलकरांकडून संताप व्यक्त होत आहे.

करोना प्रादुर्भावानंतर पनवेलमधील आरोग्य व्यवस्था सक्षम नसल्याचे वारंवार समोर आले आहे. ‘लोकसत्ता’नेही ‘पनवेलचे दुखणे’ या वृत्त मालिकेतून यावर प्रकाश टाकला आहे. असे असतानाही पालिका प्रशासन सक्षम आरोग्य सेवा पुरविण्याबाबत दुर्लक्ष करीत असल्याचे वारंवार समोर येत आहे. शहरी भागांत १९ ऑगस्टपासून बसलेला करोना संसर्गाचा विळखा अद्याप कायम आहे. ९,५६९ वर असलेली करोनाबाधितांची संख्या १९ हजार २५७ पर्यंत पोहोचली आहे. तर २४७ वर असलेली मृतांची संख्या ४२६ वर पोहोचली आहे. तर ४४ दिवसांत करोनाने मृत्युदर दुपटीपेक्षा अधिक नोंदविला गेला आहे.

पालिका क्षेत्रात करोना चाचणी होण्याचे प्रमाण जास्त आहे, एवढीच एक दिलासा देणारी बाब आहे. मागील ४४ दिवसांत दुपटीपेक्षा जास्त वेगाने करोना चाचण्या होत आहेत.

सध्या पालिका क्षेत्रातील ६६ हजार ९९२ नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये २२ ऑगस्टपासून करोनाग्रस्तांची संख्या दुप्पट होऊन ५९७९ वर आली आहे. ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण ४२ दिवसांत दुपटीपेक्षा कमी असून ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात लोकसंख्या कमी असली तरी येथे करोना चाचणीला महत्त्व न दिल्याने सहा महिन्यांत फक्त ६ हजार ५३१ जणांची चाचणी करण्यात आली आहे.  पनवेल पालिका प्रशासनाने करोनाविरुद्धच्या लढाईत जिंकण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज असून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

अधिकारी म्हणतात, रुग्ण दुपटीचा काळ ६० दिवसांवर

करोनास्थितीविषयी पनवेल पालिकेचे उपायुक्त संजय शिंदे यांना विचारले असता, पालिका रुग्णवाढ रोखण्यासाठी प्रयत्न करीत असून रुग्ण दुपटीचा काळ ६० दिवसांवर गेला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पालिका प्रशासनानेच पुरविलेल्या अधिकृत आकडेवारीवरून मात्र का कालावधी ४४ व ४२ दिवस दिसत आहे. परिस्थिती चिंताजनक असताना पालिका आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. मात्र पनवेलमध्ये हे संकट असताना क्रिकेट प्रशिक्षण केंद्रासाठी मात्र अधिक रस दाखवला जात आहे. यामुळे पालिकेचे प्राधान्य करोनाकाळात नेमके कशाला असा प्रश्न उपस्थित होत आहे.