उरण तालुक्यात ७१ शस्त्र परवानाधारक
बंदुकीचा वापर परवानाधारकांच्या स्वरसंरक्षणासाठी की सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्यासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे. स्वसंरक्षणासाठी दिलेल्या बंदुकीचा गैरवापर अनेकदा झाल्याच्या घटना समोर आल्याने या संदर्भात बंदुकीचे परवाने कशासाठी दिले जातात, याची जबाबदारी कोणाची, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
उरण तालुक्यातील तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून देण्यात आलेले ७१ परवाना बंदूकधारी आहेत.
मागील आठवडय़ात उरण शहरात दोन गटांत झालेल्या हाणामारीत परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी झाडल्याची घटना घडली. त्यामुळे शस्त्र परवानाधारकांबद्दल संशय निर्माण झाला आहे. ब्रिटिशकाळापासून शस्त्र परवाना दिला जातो. जंगल आणि शेतात राहणाऱ्यांना रानटी प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी बंदूक दिली जात होती. त्यानंतर त्यात उद्योग, व्यवसायिकांचीही भर पडली. व्यवसाय करीत असताना संरक्षणासाठी बंदूक वापराचा परवाना दिला जाऊ लागला. तर सध्या राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये असलेल्या वादातून हत्या होऊ लागल्याने अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही आपल्या स्वसंरक्षणासाठी बंदुकीचे परवाने घेतलेले आहेत; मात्र या परवानाधारकांकडून समाजात दहशत निर्माण करण्यासाठी तसेच बडेजाव मिरविण्यासाठी बंदुकीचा वापर केल्या जात असल्याच्या तक्रारीतही वाढ झालेली आहे. शस्त्र परवानाधारक कंबरेवर पिस्तुल मिरविताना दिसत आहेत.