X

प्रासंगिक : आंबेडकर भवनाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा

स्मारकाच्या कामाला ६ एप्रिल २०११ला सुरुवात करण्यात आली.

संगमरवरी घुमट, करण्यात आलेला खर्च, उद्घाटनाच्या नवनवीन तारखा यामुळे ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सतत चर्चेत आणि वादात राहिले आहे. या वास्तूचे काम सुरू होऊन तब्बल सहा वर्षे उलटली आहेत. कधी हा निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा ठरला, तर कधी पालिका सभागृहातील शह-काटशहाचा, श्रेयाचा.. पण आता ही वास्तू सामान्यांसाठी कधी खुली होणार याची प्रतीक्षा नवी मुंबईकरांना आहे.

नवी मुंबई महापालिकेने शहराचे मानबिंदू ठरतील अशा अनेक इमारती आणि उद्याने विकसित केली आहेत. ऐरोली येथे उभारण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन हा आणखी एक मानबिंदू ठरू पाहत आहे, मात्र या भवनाचे उद्घाटन विविध कारणांनी वारंवार पुढे ढकलले जात आहे. या भवनासाठी महानगरपालिकेच्या निधीबरोबरच आमदार निधी, खासदार निधीदेखील खर्च करण्यात आला आहे. सर्वात भव्य डोम, ग्रंथसंपदा, स्वागत कक्ष, प्रशस्त प्रवेशद्वार आणि सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र अशा अनेक वैशिष्टय़ांनी हे भवन सजले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात अनेकदा या भवनावरून वादविवाद झाले. तुकाराम मुंढे यांच्या आयुक्तपदाच्या काळात तर या मुद्दय़ावरून प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा वाद शिगेला पोहोचला होता.

स्मारकाच्या कामाला ६ एप्रिल २०११ला सुरुवात करण्यात आली. एकूण तीन टप्प्यांमध्ये या वास्तूंची उभारणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात प्रवेशद्वार, ग्रंथालय, सभागृह, दुसऱ्या टप्प्यात आकर्षक रंगरंगोटी, सजावट त्याचबरोबर येण्या-जाण्याचा सुसज्ज मार्ग आणि तिसऱ्या टप्प्यात सर्वात उंच असा डोम साकारण्यात येत आहे. गेली सहा वर्षे या स्मारकाचे काम सुरू असून येत्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने काम पूर्ण होणार आहे. या स्मारकासाठी महानगरपालिकेकडून १२ कोटी ८४ लाख आणि आमदार निधीतून ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. वेळेत काम पूर्ण न झाल्याने मे २०१४ ही मुदतवाढ देण्यात आली होती. खर्चामध्ये वाढ होत २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. आंबेडकर स्मारकाच्या डोमला संगमरवर लावण्यासाठी १९ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महासभेत मंजूरदेखील झाला होता. पण आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनावश्यक खर्च असल्याचे सांगत डोमला मार्बल लावण्यास मनाई केली. त्या वादामुळे बांधकाम आणखी वर्षभर लांबले. त्या वेळी सभागृहात आयुक्त व लोकप्रतिनिधींमध्ये जुंपली होती.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर पुन्हा विशेष सर्वसाधारण सभेत संगमरवराचा मुद्दा मांडण्यात आला. ४९ मीटर उंचीच्या डोमला मार्बल लावण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. मार्बलवर आच्छादन करण्यात येणार असून त्यासाठी १३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

येत्या दोन ते तीन महिन्यांत निविदा निघाल्यानंतर या कामाला सुरुवात होणार आहे. किमान १८ महिन्यांत डोमचे काम पूर्ण होणार असल्याचे पालिकेचे शहर अभियंता मोहन डगावकर यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत स्मारकाच्या अंतर्गत सजावटीसाठी १० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरीदेखील देण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही या स्मारकाचा मुद्दा गाजला होता.

नवी मुंबईत सर्व धर्मीयांचे वास्तव्य आहे. त्यापैकी दिघा, कोपरखरणे, ऐरोली, रबाळे, नेरुळ, तुर्भे परिसरात बौद्ध धर्मीय आणि आंबेडकरांच्या अनुयायांचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्यासाठी ऐरोलीतील हे भव्य डॉ. आंबेडकर भवन प्रेरणास्थळ ठरणार आहे.

Outbrain