News Flash

‘पांढरपेशा’ गुन्ह्य़ांचे डोके वर!

नवी मुंबईत आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे अशा घटनांत वाढ

नवी मुंबईत आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे अशा घटनांत वाढ

नवी मुंबई : देशातील सर्व महानगरांना भेडसावणाऱ्या पांढरपेशा गुन्हेगारीने आता नवी मुंबईतही डोके वर काढले असून गेल्या वर्षी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्य़ांमध्ये आर्थिक गुन्ह्य़ांचे प्रमाण दहा टक्के इतके आहे. २०१७मध्येही आर्थिक गुन्ह्य़ांचे प्रमाण साधारण दहा टक्केच असले तरी, येत्या काळात ‘व्हाइट कॉलर’ गुन्हेगारी तसेच सायबर गुन्हे हेच नवी मुंबई पोलिसांसमोर महत्त्वाचे आव्हान असेल, अशी टिप्पणी पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी बुधवारी केली.

आर्थिक व्यवहारांत झालेली फसवणूक, नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणे, डेबिट-क्रेडिट कार्डच्या माध्यमातून लुबाडणूक, समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह मजकूर, मोबाइल किंवा संगणकातील डेटा चोरी, बेकायदा ऑनलाइन लॉटरी अशा प्रकारचे गुन्हे नवी मुंबईतही वाढत असल्याचे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून दिसून येत आहे. पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत नवी मुंबईतील गुन्हेगारीचा आलेख मांडला. २०१८ या वर्षांत नवी मुंबईत एकूण ५५१५ गुन्ह्य़ांची नोंद झाली असून त्यापैकी ३६३६ गुन्ह्य़ांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. यापैकी आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्य़ांची एकत्रित संख्या ५४६ इतकी असून २०१७च्या तुलनेत अशा गुन्ह्य़ांमध्ये १२०ने वाढ झाली आहे. २०१८ मध्ये आर्थिक फसवणुकीच्या ३६८ गुन्ह्य़ांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दुसरीकडे, सायबर गुन्हेगारीशी संबंधित घटनांमध्येही यंदा वाढ झाल्याचे दिसून आले. अशा प्रकारच्या ७५ गुन्ह्य़ांची २०१८ मध्ये नोंद झाली असून त्यामध्ये डेबिट-क्रेडिट कार्डशी संबंधित फसवणूक (१५) आणि फेसबुक, ट्विटर अशा समाजमाध्यमांवरील मजकुरांशी संबंधित(२३) गुन्ह्य़ांचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा गुन्ह्य़ांवर नियंत्रण आणण्यासाठी नवी मुंबई सायबर गुन्हे शाखेतर्फे शाळांशाळांत जाऊन समाजमाध्यमांच्या वापराबाबत जागृती निर्माण करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पांढरपेशी गुन्हेगारी आणि सायबर गुन्हे यांत होणाऱ्या वाढीची पोलीस गांभीर्याने दखल घेत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. ‘ नवी मुंबई हे आंतरराष्ट्रीय पटलावर उदय होणारे शहर असल्याने सायबर गुन्हे आणि आर्थिक गुन्ह्य़ांवर जास्त लक्ष ठेवले जाईल. महाराष्ट्र हितसंबंध संरक्षक कायद्याचा योग्य ठिकाणी वापर केल्यास त्यावर नियंत्रण मिळवता येईल. या कलमान्वये गुन्हेगाराची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद करण्यात आल्याने गुन्हेगारांवर वचक बसेल,’ असे आयुक्त संजीव कुमार म्हणाले.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत गुन्ह्य़ांची संख्या वाढत असली तरीही शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ही वाढ अपेक्षित आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून यात जनसहभागही महत्त्वाचा आहे. गुन्हेगाराला शिक्षा मिळेपर्यंत पाठपुरावा करणे आमचे काम आहे.

– संजीव कुमार, पोलीस आयुक्त नवी मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 1:31 am

Web Title: increase in incidents of financial fraud cyber crime in navi mumbai
Next Stories
1 खारघर कॉर्पोरेट पार्कचा आराखडा सिंगापूरची ‘ईडीबी’ करणार
2 एनएमएमटीची पनवेल-बोरिवली वातानुकूलित बससेवा
3 गुन्हे नोंदीतील पळवाट चुकीची
Just Now!
X