आता १४ केंद्रांवर लसीकरण; दुसऱ्या टप्प्यासाठी २० हजार लस कुप्यांची पालिकेची मागणी

नवी मुंबई : शहरात आतापर्यंत सहा हजारांहून अधिक आरोग्य सेवकांना लस देण्यात आली असून यापुढे लसीकरणाची संख्या वाढविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असून आता चौदा केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी २० हजार लस कुप्यांची पालिकेची मागणी शासनाकडे केली आहे.

शहरात १६ जानेवारीपासून चार केंद्रांवर दररोज चारशे जणांचे लसीकरण करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले होते. त्यानंतर एका केंद्रांची वाढ करीत दररोज एक हजार जणांना लस देण्याचे नियोजन केले होते. त्यानंतर सहा केंद्रांची वाढ करीत आता १४ केंद्रांवर दरदिवशी १४०० आरोग्य सेवकांना लस दिली जात आहे. सोमवारपासून  हिरानंदानी, एमजीएम वाशी, माथाडी हॉस्पिटल, तेरणा हॉस्पिटल ही चार केंद्रे वाढविण्यात आली आहेत.  पहिल्या टप्प्यात १९०८५ करोना योद्ध्यांची नोंद झाली असून त्यांना लस देण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यातील लसीकरण लवकरात लवकर संपवत दुसऱ्या टप्प्याचे नियोजन पालिका प्रशासनाने सुरू केले आहे. पन्नास केंद्रे वाढविण्याची पालिकेची तयारी आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी पोलीस, जवान, पालिका कर्मचारी, सफाई कामगार, शिक्षक यांना लसीकरण करण्यात येणार असून अशा सर्वांचा समावेश आहे. यासाठी २० हजार लस कुप्यांची मागणी पालिकेने शासनाकडे केली आहे,  अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी  दिली.

लसीकरण केंद्रे

  • अपोलो हॉस्पिटल – ३
  •  डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय – २
  •  वाशी सार्वजनिक रुग्णालय – १
  •  ऐरोली सार्वजनिक रुग्णालय – २
  •  रिलायन्स हॉस्पिटल, कोपरखैरणे – २
  • हिरानंदानी, वाशी – १
  •  एमजीएम, वाशी – १
  •  माथाडी हॉस्पिटल, कोपरखैरणे – १
  • तेरणा हॉस्पिटल, नेरुळ – १

नवी मुंबईत लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त लसीकरण केंद्रांची परवानगी मिळवण्यासाठी पालिका प्रयत्नशील असून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी शासनाकडे अतिरिक्त लस कुप्यांची मागणी केली आहे.    -अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका