नवी मुंबई : नवी मुंबईत दैनंदिन करोना रुग्णसंख्येत वाढ कायम असल्याने शहरातील करोनाबधितांची संख्या ८० हजारांपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांतही झपाट्याने वाढ होत आहे.  मागील आठवड्यात शहरात ४ हजार प्रतिबंधित क्षेत्र होते. गेल्या दहा दिवसांत १ हजारांनी वाढ होऊन आता साडेपाच हजारांवर गेली आहे.

सद्य:स्थितीत नवी मुंबई शहरात पहिल्या प्रवर्ग ४७७३, दुसऱ्या प्रवर्गात ९०१ व तिसऱ्या प्रवर्गात ३ अशी एकूण ५६७७ प्रतिबंधित क्षेत्र तर मायक्रो ८२ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. तेच मागील आठवड्यात ४ हजार प्रतिबंधित क्षेत्र होते.

करोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी या प्रतिबंधित क्षेत्रावर अधिक जोर दिला जात आहे. सध्याच्या स्थितीत करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. कुटुंबातील एक व्यक्तीला लागण होताच घरातील बहुतांश सदस्यांना लागण होत आहे. त्यामुळे या प्रतिबंधित क्षेत्रांवर भर दिला जात आहे. पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात दोनने वाढ झाली आहे.

दीड लाख नागरिकांचे लसीकरण

लस कुप्यांअभावी बंद पडलले लसीकरण शहरात सुरळीत सुरू झाले असून आतापर्यंत दीड लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये एक लाखांहून अधिक ४५ वर्षांवरील नागरिकांचा समावेश आहे.

महापालिकेची २८ रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रे तसेच २१ खासगी रुग्णालये अशा ४९ लसीकरण केंद्रांवर करोना लसीकरण होत आहे. १४ एप्रिलपर्यंत १ लाख ५८ हजार २७० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये  ४५ वर्षावरील १ लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

दररोज साधारणत: ७ हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण होत आहे. महापालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली या तीन रुग्णालयांत दिवसरात्र २४ तास लसीकरण करण्यात येत आहे. तुर्भे येथील रामतनु माता बाल रुणालय आणि सर्व २३ नागरी आरोग्य केंद्रांत लसीकरण होत आहे.