उरण : तालुक्यात केवळ तीन केंद्रांवरून करोना लसीकरण करण्यात येत होते. त्यामुळे मोठी गर्दी होत होती व रात्री १२ वाजल्यापासून नागरिक रांगा लावत होते. त्यामुळे यात आणखी तीन केंद्रांची वाढ करण्यात येणार आहे. चिरनेर, विंधणे व जासई येथील आरोग्य उपकेंद्रांत लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

उरणमधील लसीकरण केंद्रावर सध्या मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आहे. दररोज लसीकरण करण्यासाठी मध्यरात्रीपासून रांगा लावल्या जात आहेत. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उरण तालुक्याला होणारा मर्यादित लसपुरवठा तसेच लोकसंख्येच्या तुलनेत कमी लसीकरण केंद्र. या मध्ये वाढ करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर यांनी केली होती. तसेच या संदर्भात नागरिकांकडून तक्रारीही करण्यात येत होत्या.  मागणीचा विचार करीत जिल्ह्य़ाच्या झालेल्या बैठकीत उरणमधील लसीकरण केंद्रात वाढ करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उरण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असलेल्या चिरनेर, विंधणे व जासई येथे नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असून पूर्वतयारी करण्यात आल्याचे  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांनी सांगितले.