News Flash

 ‘धूर’खान्यांमुळे नवी मुंबई त्रस्त

उद्योजकांमुळे नवी मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कारखान्यांतून नायट्रोजन डायऑक्साइड थेट हवेत सोडण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे.

हिवाळ्यात धुक्याचा गैरफायदा घेत कारखान्यांकडून प्रदूषित वायू सोडण्याच्या प्रमाणात वाढ

हिवाळ्यात पडणारे धुके आणि पावसाळ्यात वाहणारे झरे यांचा वापर आपल्या कारखान्यातील धूर आणि सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता वातावरणात सोडण्यासाठी करणाऱ्या उद्योजकांमुळे नवी मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धुक्याचा गैरफायदा घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचा डोळा चुकवून नायट्रोजन डायऑक्साइड हवेत सोडून देणाऱ्या रंग उत्पादक कारखान्यांमुळे सध्या शहरात सर्वत्र धुरके पसरले आहे. त्यामुळे येथील नागरी वसाहतीतील रहिवाशांना मळमळणे, अस्वस्थ वाटणे यासारखे त्रास होऊ लागले आहेत.

नवी मुंबईतील तळोजा या टीटीसी औद्योगिक वसाहतीत बाराही महिने जल व वायुप्रदूषण करणाऱ्या रंग उत्पादन कारखान्यांतून नायट्रोजन डायऑक्साइड थेट हवेत सोडण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. औद्योगिक वसाहतीसमोरच असलेल्या नागरी वसाहतीला याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या किती कारखान्यांना गेल्या वर्षभरात नोटिसा बजावण्यात आल्या, याची आकडेवारीही महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध नाही. ही माहिती तात्काळ देता येणे शक्य नाही, असे सांगून मंडळाने हात झटकले आहेत.

नवी मुंबईतील दिघा, रबाळे, महापे, खैरणे, पावणे, तुर्भे, शिरवणे आणि तळोजा या औद्योगिक वसाहतींतील साडेतीन हजार कारखान्यांपैकी ४० टक्केकारखान्यांत रासायनिक प्रक्रिया केल्या जात. या भागात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची संख्या वाढल्यामुळे या कारखान्यांनी येथील गाशा गुंडाळून कारखान्यांच्या जमिनी विकून टाकल्या. त्यामुळे हे प्रमाण आता २० टक्क्यांवर आले आहे. या २० टक्केरासायिनिक कारखान्यांपैकी बडे कारखाने आपल्या कारखान्यातून निघणाऱ्या सांडपाण्यावर आणि प्रदूषित वायूंवर स्वत:च प्रक्रिया करतात. त्यासाठी त्यांनी कारखान्याच्या आवारातच प्रक्रिया केंद्रे उभारली आहेत. छोटे कारखाने मात्र दूषित पाणी आणि हवा कोणतीही प्रक्रिया न करता बाहेर सोडून देतात.

धुके आणि धूर साधारण सारखेच दिसत असल्याचा फायदा घेत थंडीच्या दिवसांत हे वायू थेट हवेत सोडून देण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात जेव्हा या भागांतील डोंगरांवरून ओहोळ वाहू लागतात, तेव्हा हे कारखाने या ओहोळांतच सांडपाणी सोडून देतात. त्यामुळेच पावसाळ्यात येथील नाल्यांतून रंगीत पाणी वाहताना दिसते. हे प्रदूषण परसवण्यात रंग बनविणारे कारखाने आघाडीवर आहेत, असे पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

थंड हवा वेगाने पसरत नसल्यामुळे हवेत सोडण्यात आलेल्या धुराचे सूक्ष्म कणही एकाच जागी जास्त काळ स्थिर राहतात. त्यामुळे प्रदूषणाची जाणीव अधिक तीव्रतेने होते. या प्रदूषणामुळे डोळे चुरचरणे, मळमळणे आणि अस्वस्थ वाटणे अशा तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. ‘सुरुवातीला हे धुके आहे, असे वाटत होते, मात्र आता त्याचा त्रास होऊ लागला आहे. बस आणि रेल्वेतून प्रवास करतानाही घुसमट होते,’ असे वाशीतील रहिवासी विजय साळवी यांनी सांगितले.

कोपरखैरणे, तुर्भेत सर्वाधिक प्रदूषके

हवेतील धुलिकणांची संख्या प्रतिमीटर १०० मायक्रोग्रॅमपर्यंत असणे सामान्य मानले जाते. संनियंत्रित हवा गुणवत्ता केंद्राच्या अहवालानुसार बुधवारी ऐरोलीत हे प्रमाण ९२ म्हणजेच सामान्य पातळीवर होते, मात्र हेच प्रमाण कोपरखैरणेत १४६ तर तुर्भे येथे १४२ एवढे मोठे होते. त्यामुळे तेथील रहिवाशांना प्रदूषणाचा अधिक धोका असल्याचे दिसते.

पीएम २.५ म्हणजे काय?

पीएम म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर. हवेतील हे अतिसूक्ष्म कण मानवी आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. इंधनाच्या ज्वलनातून हे कण बाहेर पडतात. कारखाने आणि वाहने हे यामागचे महत्त्वाचे कारण असते. पीएम २.५ म्हणजे २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यासाचे कण. हे प्रदूषण द्रवरूप तुषारांच्या स्वरूपातही असते. हे कण किंवा तुषार श्वासातून फुफ्फुसांपर्यंत खोल जाऊ  शकतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघातासारखे प्राणघातक आजार होऊ  शकतात. सोप्या पद्धतीने सांगायचे झाल्यास, या कणांचा आकार माणसाच्या केसाच्या ३०व्या भागाएवढा लहान असतो.

सकाळी व्यायामासाठी खुल्या हवेत जाणाऱ्यांनी हिवाळ्यात शक्यतो थोडे उन पडल्यानंतरच घराबाहेर पडावे. उन्हामुळे हवा प्रसरण पावते व धूर वरच्या दिशेने निघून जातो. त्यामुळे धुरक्याचा त्रास कमी होतो. सकाळी लवकर घराबाहेर पडावे लागल्यास नाका-तोंडावर ओला रुमाल बांधावा. हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, अ‍ॅलर्जीच्या रुग्णांना अधिक त्रास होतो. यासाठी प्रतिबंधक लसही उपलब्ध आहे

– डॉ. संदीप मेस्त्री, ऐरोली, नवी मुंबई

प्रदूषणाबाबत कारखान्यांना समज दिल्यानंतरही सुधारणा न केल्यास त्यांची एमपीसीबीकडे तक्रार केली जाते. रबाळेतील एक कारखाना अशा तक्रारीमुळेच बंद करण्यात आला. छोटय़ा कारखान्यांकडे हवा व जल प्रदूषणावर प्रक्रिया करणारी यंत्रणा नाही. 

– के. आर. गोपी, अध्यक्ष, स्मॉल स्केल आंत्रप्रेन्युअर्स, असोसिएशन

नवी मुंबईत वाहने, कारखाने यांमुळे प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. राष्ट्रीय महामार्ग, कृषी उत्पन्न बाजार, जेएनपीटीकडे जाणारा मार्ग टीटीसी औद्योगिक वसाहत यामुळे प्रदूषणाची पातळी वाढू लागली आहे. हिवाळ्यात हे प्रदूषण अधिक तीव्रतेने जाणवते. 

– अंजली पारसनीस,  संचालिका, टेरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2017 1:50 am

Web Title: increasing in quantity of gas releasing by factories in navi mumbai
Next Stories
1 ‘फिफा’चे यजमान मैदानांविषयी उदासीन
2 महापौर निवडणुकीसाठी नगरसेवक अज्ञातवासात
3 धुरक्यामुळे घुसमट
Just Now!
X