जासई

बेलापूर-उरण मार्गावर जेएनपीटी बंदरापासून पाच किलोमीटरवर आणि बेलापूर रेल्वे स्थानकापासून १० किलोमीटरवर जासई गाव आहे. हे गाव ८०च्या दशकात देशात गाजले. शासकीय प्रकल्पासांठी ज्यांची जमीन संपादित करण्यात आली होती, त्यांना भरपाईपोटी साडेबारा टक्के भूखंड देण्याची योजना या गावातील एका रक्तरंजित आंदोलनामुळे सुरू झाली. त्यामुळेच हे गाव ‘साडेबारा टक्के भूखंड’ योजनेचे जनक ठरले आणि क्रांतिकारी गाव म्हणून ओळखले जाऊ लागले. शेतकरी नेते आणि माजी खासदार दिवगंत दि. बा. पाटील यांचे हे जन्मगाव आज शहरीकरणामुळे गजबजले आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक

जेमतेम अडीच हेक्टर जमिनीवर वसलेल्या या गावाचे नाव गावातील जोगेश्वरी देवीच्या नावाचा अपभ्रंश होऊन पडल्याचे मानले जाते. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे रम्य गाव होते. या गावातील कारली त्याकाळी देशातील अनेक भागांत विकली जात. आज जेएनपीटी बंदाराकडे ये-जा करणाऱ्या कंटेनरनर्सच्या अखंड वाहतुकीमुळे येथील शांततेवर ओरखडे उमटले आहेत. पूर्वेकडे नजर पोहोचेल तिथवर पसरलेली विस्र्तीण शेती आणि पश्चिमेला मिठागरे, दक्षिण बाजूला डोंगररांगा आणि उत्तर बाजूला खाडीकिनारा, अशी या गावाची भौगोलिक रचना होती. या गावापासून उरणची सुरुवात होत असे आणि पनवेलची हद्द संपत असे.

येथे आगरी, कऱ्हाडी आणि तुरळक प्रमाणात दलित लोकवस्ती होती. गावातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाला एक इतिहास आहे. सुरुवातीला चौथीपर्यंत असलेली ही शाळा नंतर पंचक्रोशितील एकमेव माध्यमिक शाळा म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यामुळे १० गावांतील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येऊ लागले. शाळेच्या प्रांगणातच पाच हुतात्म्यांचे स्मारक आहे. भारताचा इतिहास विद्यार्थ्यांच्या स्मरणात रहावा आणि त्यांच्यासमोर आदर्श असावा यासाठी स्मारकाच्या बाजूलाच पाच महापुरुषांचे अर्धपुतळे उभारण्यात आले आहेत.

सिडकोने मार्च १९७० मध्ये नवी मुंबई शहर प्रकल्पासाठी उरण, पनवेल आणि ठाणे जिल्ह्य़ातील बेलापूर येथील जमिनी संपादित केल्या. त्यावेळी येथील शेतकऱ्यांना रेडी रेकनरनुसार जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रतिएकरी दर देण्यात आला होता. हा दर अतिशय तुटपुंजा आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याचे दि. बा. पाटील यांनी सरकारला ठणकावून सांगितले. कमीत कमी ४० हजार रुपये दर देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी त्यावेळी केली. त्यासाठी १६ व १७ जानेवारी १९८४ रोजी उरणमध्ये तीव्र आंदोलने झाले. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी तात्कालीन काँग्रेस सरकारने पोलीस बळाचा वापर करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात नामदेव शंकर घरत, रघुनाथ अर्जुन ठाकूर, महादेव हिरा पाटील, केशव महादेव पाटील (पिता-पुत्र) आणि कमलाकर कृष्णा तांडेल या पाच शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. त्या पाच शेतकऱ्यांचे स्मृतिस्तंभ जासई गावातील शाळेच्या प्रांगणात आहेत. आज ज्या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी शाळा उभी आहे, त्या ठिकाणी आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थ हजारोच्या संख्येने गोळा झाले होते. संवादाचे कोणतेही साधन नसताना गावातील तरुणांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर उतरल्या होत्या. पहिले आंदोलन दास्तान फाटय़ावर झाले तर दुसऱ्या दिवशी नवघर फाटय़ावर आंदोलन करावे लागले. आंदोलन चिरडण्यासाठी कार्यकर्त्यांची दोन दिवस आधीच उचलबांगडी केली जात असे. या दोन्ही आंदोलनांत केलेल्या अमानुष लाठीमारात शेकडो ग्रामस्थ जखमी झाल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.

आंदोलनामुळे काँग्रेस सरकार खडबडून जागे झाले. तेव्हापासून शेतकऱ्यांना वाढीव भरपाई देण्याची चर्चा सुरू झाली. त्याला सप्टेंबर १९९४ मध्ये वास्तव स्वरूप आले आणि नवी मुंबई शहर प्रकल्पातील सोळा हजार शेतकऱ्यांना साडेबारा टक्के योजनेअंर्तगत भूखंड देण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले. या भूखंडांमुळे येथील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलून गेले. ही योजना सरकारच्या गळी उतरविण्याचे श्रेय जासई गावचे दि. बा. पाटील यांना जाते. गावातील सर्व ग्रामस्थ आजही दि. बा. पाटील यांचे  नाव मोठय़ा अभिमानाने आणि आदराने घेतात. गावाच्या शाळेत आज महाविद्यालय सुरू झाले आहे. शाळेच्या प्रांगणात दिबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.

पूर्वी या गावात शेती आणि भाजीपाल्याचे उत्पादन इतकीच काय ती रोजगाराची साधने होती. येथील कारली  देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहचविण्याचाही प्रयत्न करत होते. कारल्यांचे गाव अशीही या गावाची ओळख होती.

आज सिडकोने हे गाव ‘मॉर्डन व्हिलेज’ योजनेत विकसित करण्यास सुरुवात केली आहे. गावातील रस्ते, गटार, पाणी, मलनिस्सारण योजना यामुळे गाव सुधारणार आहे. गावठाण विस्तार योजना राबविण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. दिबांच्या काळात संपूर्ण गाव शेकापच्या अधिपत्याखाली होते. आज  अनेक पक्षांत ग्रामस्थ विभागले गेले आहेत. तरीही गावाच्या विकासासाठी सर्वजण एकत्र येतात. गावात साडेनऊ कोटी रुपये खर्च करून हुतात्मा भवन बांधण्याचा संकल्प ग्रामस्थांनी सोडला आहे. या हुतात्मा भवनात अनेक समाजोपयोगी उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. दिबांचा वारसा जपण्याची इच्छा येथील ग्रामस्थांत आजही कायम आहे.

मंदिरांचा जीर्णोद्धार

३०-४० कुटुंबांच्या या गावात विठ्ठल, भैरवनाथ, शंकर, हनुमान, जोगेश्वरी आणि गावदेवी अशी सहा-सात मंदिरे आहेत. या पडझड झालेल्या मंदिरांचा ग्रामस्थांनी नुकताच जीर्णोद्वार केला. त्यामुळे गावातील सर्व मंदिरांना एक झळाळी प्राप्त झाली आहे. गावदेवी मंदिराची चैत्र महिन्यात होणारी जत्रा लक्षवेधी असते.

दिबांमुळे कायापालट

गावातील एका तरुणाने शिक्षण घेतल्यास गावाचा कसा कायापालट होऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. पुण्यात विधी शिक्षण करून केवळ दोन वर्षे वकील केल्यानंतर दि. बा. पाटील यांनी समाजकरणास सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी रायगड जिल्ह्य़ात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळांची मुर्हतमेढ रोवली. दिबा दोनदा खासदार आणि पाच वेळा आमदार झाले. साडेबारा टक्के भूखंडासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळेच शेतकऱ्यांचा काही प्रमाणात विकास होऊ शकला.