तुर्भे येथील घटना; पालिका व जिल्हा परिषदेची टोलवाटोलवी

तुर्भे येथील हनुमान नगर येथील अंगणवाडीत शनिवारी देण्यात आलेल्या पोषण आहारात किडे सापडले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्याऐवजी ही अंगणवाडी आहे की बालवाडी यावर वाद घालण्यात आणि जबाबदारीची टोलवाटोलवी करण्यात पालिका आणि जिल्हा परिषद व्यग्र आहे.

तुर्भे येथील महानगरपालिका शाळा क्रमांक ३९च्या बाजूला ही अंगणवाडी भरते. मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात शनिवारी किडे आढळले. त्यामुळे असे अन्न मुलांना दिल्यास त्यांचे पोषण होण्याऐवजी आरोग्य ढासळेल, अशी भीती पालकांनी व्यक्त केली. याबाबत पालिकेला विचारले असता, ही अंगणवाडी असून ती एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेच्या अख्यारीत येते, असे स्पष्टीकरण देण्यात आले. पालिकेच्या अशा ५३ बालवाडय़ा असून बालवाडीमध्ये पोषण आहार दिला जात नाही. इयत्ता पहिलीपासून पुढे खाऊवाटप केले जाते, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. तर दुसरीकडे ठाणे जिल्हा परिषदेच्या बालकल्याण विकास विभागातून पत्त्यानुसार ही महापालिकेची बालवाडी असल्याचे सांगितले जात आहे. नक्की काय प्रकार घडला आणि कोणत्या विभागात घडला याची शहानिशा करण्यात येईल, अशी माहिती बालकल्याण विभागाने दिली. बालवाडीमध्ये २ ते ३ वर्षे वयोगटातील तर अंगणवाडीमध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुले शिकतात. बालवाडी पालिकेच्या अंतर्गत आणि अंगणवाडी ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येते.

एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत नवी मुंबईत ठाणे जिल्हा परिषदेच्या तुर्भे विभागांतर्गत २५, बेलापूर विभागाच्या अखत्यारीत २९ तर घणसोली विभागात ३० अशा एकूण ८४ अंगणवाडय़ा आहेत. त्यांना पोषण आहार पुरवण्याची जबाबदारी ठेकेदार आणि स्थानिक बचत गटांवर सोपवण्यात आली आहे.

ही अंगणवाडी ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते. नवी मुंबई महापालिकेच्या बालवाडय़ा आहेत, अंगणवाडय़ा नव्हेत.

– संदीप सांगवे, शिक्षण अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका


या प्रकरणाची ठाणे जिल्हा परिषद बालकल्याण विकास विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे. याची शहानिशा करून नक्की काय घडले, हे लवकरच स्पष्ट करण्यात येईल.

– यादव गायकवाड, विस्तार अधिकारी, बाल कल्याण विकास, ठाणे जिल्हा परिषद