18 February 2019

News Flash

वाशी बसस्थानकात वाणिज्य संकुल

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामध्ये वातानुकुलित आणि सर्वसाधारण अशा एकूण ४५२ बसेस आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

सुमारे १४० कोटींचा खर्च अपेक्षित 

नवी मुंबई : दरमहा सुमारे तीन-सव्वातीन कोटी रुपयांचे नुकसान सहन करणाऱ्या परिवहन उपक्रमाला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी आता वाशी बसस्थानकाचा व्यावसायिक वापर करण्यात येणार आहे. तिथे देखणे वाणिज्य संकुल उभारण्यात येणार आहे. गेल्या आठवडय़ात सल्लागार नियुक्तीसाठी दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आयुक्त डॉ. रामास्वामी एन. व अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण केले. त्यापैकी नाईट फ्रँक (इं) प्रा. लि. यांची निविदा लवकरच मंजुरीसाठी परिवहन समितीकडे पाठवण्यात येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामध्ये वातानुकुलित आणि सर्वसाधारण अशा एकूण ४५२ बसेस आहेत. त्यापैकी ४१५ बस रस्त्यावर धावतात. परिवहनच्या एकूण ७५ मार्गावरील सुमारे १,२६,६९९.२ किमी अंतर रोज पार केले जाते. यामध्ये वातानुकुलित ११ मार्ग आणि सर्वसाधारण ६४ बसमार्ग आहेत. दररोज साधारणपणे २.६ लाख प्रवासी ही सेवा वापरतात. अपंग व एड्ससारख्या गंभीर आजारांच्या रुग्णांना बसमधून मोफत प्रवासाची सेय आहे. ज्येष्ठ नागरिकांना तिकिटामध्ये व विद्यार्थ्यांना मासिक पाससाठी प्रत्येकी ५० टक्के सवलत दिली जाते. पालिकेच्या परिवहन उपक्रमाचा विस्तार मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, उरण व पनवेलपर्यंत करण्यात आला आहे.

एनएमएमटीच्या उपक्रमाचा गाडा रेटण्यासाठी व तोटा भरून काढण्यासाठी पालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे. वाशी हे नवी मुंबई महापालिकेतील महत्त्वाचे उपनगर आहे. याच ठिकाणी बसस्थानकासह आयकॉनिक वाणिज्य संकुल उभारून त्यातून येणाऱ्या मिळकतीतून परिवहनचा होणारा तोटा भरूनकाढत शहरातील नागरिकांना अधिक दर्जेदार परिवहन सेवा देण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. वाशी बसस्थानक हे अत्यंत मध्यवर्ती असून या बसस्थानकाच्या बाजूला विविध सेक्टरमध्ये वाणिज्य संकुले आहेत. या स्थानकाच्या विकासासाठी अनेकवेळा सल्लागारांसाठी निविदा मागवल्या होत्या. परंतु योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. आता दोन निविदा आल्या असून त्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्याच कंपन्यांनी नुकतेच प्रकल्पाचे सादरीकरण केले आहे. तीनपेक्षा जास्त वेळा निविदा मागवूनही योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर नियमानुसार दोन निविदांमध्येही निविदा निश्चित करता येते. सल्लागाराच्या निवडीसाठी प्रस्ताव परिवहन समितीकडे मंजुरीकडे पाठवणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे आता वाशी बसस्थानकाचे रूप पालटणार असून त्याच्या कामाच्या प्रक्रियेला वेग येणार असल्याचे स्पष्ट आहे.

सद्य:स्थितीत वाशी बसस्थानकातून पालिका परिवहन, तसेच एसटी बसस्थानक तसेच बेस्टच्या गाडय़ा मुंबईसह विविध भागांत जातात. प्रोजेक्ट मॅनेजमेंट, आर्किटेक्ट व प्रत्यक्ष वाणिज्य संकुल भाडय़ाने देणे ही तीनही कामे सल्लागारावर सोपवण्यात येणार आहेत.

वाणिज्य संकुलाचे स्वरूप

* सल्लागारासाठी अंदाजे खर्च ५ कोटी ६० लाख रुपये

*  तळमजल्यावर विविध दुकाने व बसस्थानक

*  तीन मजल्यांवर ३५० वाहनांच्या पार्किंगची सोय

*  मंजूर एफएसआय प्रमाणे १० ते १२ मजले उभारणार

*  प्रकल्पाचा अंदाजे खर्च १६० कोटी रुपये

शहरात असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या ठिकाणी देखणे वाणिज्य संकुल उभारून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून परिवहन सेवा अधिक सक्षम व दर्जेदार करण्यात येणार आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सादरीकरण केले असून लवकरच सल्लागाराच्या नियुक्तीसाठीचा प्रस्ताव परिवहन समितीपुढे ठेवण्यात येणार आहे.

– डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका

First Published on May 8, 2018 3:35 am

Web Title: integrated commercial complex in vashi bus station