आजपासून प्रायोगिक तत्त्वावर खाटांमध्ये वाढ; मार्चअखेर ६०० खाटांच्या सुविधेचा संकल्प

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई : नवीन वर्षांसाठी नवी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नेरुळ, ऐरोली येथील माताबाल रुग्णालयातील आरोग्यव्यवस्था सक्षम करण्यासाठी गेला महिनाभर सुरू असलेले नियोजन १ जानेवारीपासून प्रत्यक्षात उतरत असून अतिदक्षता व औषध विभाग या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहेत. मार्चअखेर या दोन रुग्णालयांतील तीनशे खाटा कार्यान्वित होणार असून  फेब्रुवारीमध्ये शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्याचे नियोजन आहे.

मागील १० वर्षांपासून करोडो रुपये खर्चून पालिका प्रशासनाने या उत्तुंग इमारती बांधल्या होत्या. मात्र फक्त बारुग्ण सेवा या ठिकाणी सुरू होती. त्यामुळे चांगल्या आरोग््य सुविधा मिळत नसल्याने नागरिकांत नाराजी होती. रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयावरच या आरोग्य सेवेचा मोठा ताण येत होता. असे असताना नेरुळ व ऐरोली येथे बांधलेल्या रुग्णालयांची क्षमता ३०० खाटांची असतानाही त्या ठिकाणी फक्त बारुग्ण सेवा दिली जात होती. या सात मजल्यांच्या दोन्ही इमारतींमध्ये चार मजले पडून होते. करोनाकाळात पालिकेची आरोग्य सुविधा तोकडी पडल्याने पालिका प्रशासनाला मोठय़ा प्रमाणात या सुविधा वाढवाव्या लागल्या. खासागी रुग्णालयांचाही आधार घ्यावा लागला. यासाठी कोटय़वधी रुपये मोजावे लागले. त्यामुळे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ऐरोली व नेरुळ येथील या सात मजली इमारती वापरात आणण्याचे नियोजन आखत ही दोन्ही रुग्णालये सामान्य रुग्णालय करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी गेला महिनाभर रुग्णालयत प्रत्यक्ष भेटी, बैठका घेतल्या जात होत्या.  त्यानुसार नवीन वर्षांच्या पहिल्या दिवसापासून प्रायोगिक तत्त्वावर या दोन्ही रुग्णालयांत अतिदक्षता व औषध विभाग सुरू करण्यात येत आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १५ खाटांची सुविधा असलेला महिला व पुरुष औषध उपचार विभाग आणि १० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे.

यासाठी आवश्यक उपकरणे व साहित्य, औषधे आणि मनुष्यबळाची पूर्तता करण्यात आली आहे. गॅस वाहिनीचे कामही सुरू करण्यात आले असून १ जानेवारीपासून ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी दिली.

करोनाच्या संकटामुळे आरोग्य सुविधांची सक्षमता हवी याचा धडा सर्वानाच मिळाला. त्यामुळे आपल्याकडे पायाभूत सुविधा असताना या सेवा अपुऱ्या पडत असल्याने वाशी रुग्णालयातील ३०० खाटांच्या आरोग्य सुविधेसारखीच नेरुळ व ऐरोली रुग्णालयात प्रत्येकी ३०० खाटांची सक्षम आरोग्य सुविधा मार्चअखेर उभी राहील. त्यामुळे९०० खाटांची सेवा पुढील काळात मिळेल.

-अभिजीत बांगर, आयमुक्त

आवश्यक उपकरणांसह मनुष्यबळ पुरवठा

या दोन्ही रुग्णालयांत अतिदक्षता खाटा, कृत्रिम श्वसन यंत्रणा यासह आवश्यक उपकरणांची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच औषधपुरवठा व  गॅस वाहिनीचे काम सुरू करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिका, वॉर्ड बॉयसह सफाई कर्मचारी आदी मनुष्यबळाचा पुरवठाही करण्यात आला आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून सेवा सुरू होईल.