आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी तयारी

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने पक्षांतर्गत मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. नवी मुंबईतील शिवसेनेते आमूलाग्र बदल केले जाणार आहेत. गेली साडेतीन वर्षे जिल्हाप्रमुख नसलेल्या या शहरात आता चक्क दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग पाडून दोन जिल्हाप्रमुख नेमले जाणार आहेत. त्याचप्रमाणे उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आणि कार्यालय प्रमुख या पदांची ‘घाऊक’ निर्मिती केली जाणार आहे. कमी वेळात लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नवी मुंबईत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. लोकसभा निवडणुकीत या पक्षाला शहरातून सर्वाधिक मते मिळाली होती तर विधानसभा निवडणुकीत या पक्षाने ऐरोली व बेलापूर या दोन मतदारसंघात सपाटून मार खाल्ला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्यामुळे सर्व मतदारसंघांत मोर्चेबांधणी सुरू आहे. नवी मुंबई याला अपवाद नाही.

नवी मुंबईत माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि उपनेते विजय नाहटा यांच्यात विस्तव जास्त नसल्याने दोन उभे गट पडले आहेत. त्यामुळे पक्षाची बांधणी खिळखिळी झाली आहे. अनेक नगरसेवक भाजप आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. लोकसभा विधानसभा निवडणुकांना जास्त काळ शिल्लक नाही. त्यामुळे जास्तीत जास्त पदनिर्मिती करून सर्व नाराज कार्यकर्त्यांना खूश करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यासाठी वाशी ते दिवाळे आणि दिघा ते वाशी म्हणजेच दक्षिण व उत्तर असे दोन भाग करून दोन जिल्हाप्रमुखपदे निर्माण केली जाणार आहेत. या दोन जिल्हाप्रमुखांना सहकार्य करणाऱ्या चार उपजिल्हाप्रमुखपदांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव नवी मुंबईतील शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिला आहे. त्यानंतर दोन शहर प्रमुख आणि १४ उपशहरप्रमुखांची निर्मिती केली जाणार आहे. त्यानंतर दोन प्रभागांसाठी एक विभागप्रमुख आणि उपविभाग प्रमुख नेमले जाणार आहेत. शिवसेनेचा खंदा कार्यकर्ता असलेले शाखाप्रमुख पद हे प्रत्येक प्रभागासाठी निर्माण केले जाणार आहेत. नवी मुंबईत एकूण १११प्रभाग आहेत मात्र काही प्रभाग हे भौगोलिकदृष्टय़ा खूप मोठे असल्याने त्यांचे दोन भाग करून दोन शाखाप्रमुख कामकाज पाहणार आहेत. शाखाप्रमुखांना उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आणि कार्यालय प्रमुख निवडीचे अधिकार दिले जाणार आहे. या पदाधिकाऱ्यांचे क्षेत्र त्यांच्या नियुक्तीपत्रात नमूद केले जाणार आहे. घाऊक पदनिर्मितीमुळे मोठय़ा प्रमाणात नाराजीदेखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असे ब्रीद आहे. नवी मुंबईची भौगोलिक रचना इतर शहरांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे दिघा ते दिवाळ्यापर्यंत संघटनात्मक पुनर्बाधणी केली जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाता यावे यासाठी ही पदनिर्मिती केली जाणार आहे.

      – विठ्ठल मोरे, शिवसेना, संपर्क प्रमुख, बेलापूर