22 April 2019

News Flash

विमानतळ धावपट्टीच्या कामाला सुरुवात!

सात महिन्यांत टर्मिनल उभे राहणार

विमानतळासाठी सुरू असलेले सपाटीकरणाचे काम.

|| विकास महाडिक

सात महिन्यांत टर्मिनल उभे राहणार; चार गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्नदेखील निकाली

देशाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या महामुंबईतील पहिल्या आंतरराष्ट्रीय ग्रीन फिल्ड विमानतळाच्या धावपट्टी बांधकामाला दक्षिण बाजूकडून सुरुवात करण्यात आली आहे. पुढील वर्षी या विमानतळावरून पहिले उड्डाण करण्याच्या दृष्टीने विमानतळ बांधकाम कंपनीने वेग घेतला आहे.

याच वेळी येत्या दोन महिन्यांत मुख्य प्रवासी टर्मिनलच्या कामाला सुरुवात होऊन ते काम सात ते आठ महिन्यांत पूर्ण करण्याचे आव्हान विमानतळ बांधकाम कंपनीसमोर आहे. चार गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्नदेखील निकालात निघणार असून या महिनाअखेर गावातील सर्व घरे प्रकल्पग्रस्त निष्कासित करण्याची शक्यता आहे. बोटावर मोजण्याइतकी घरे आता मोकळी करणे शिल्लक आहे. सिडकोने लवकर गाव खाली करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना विशेष प्रोत्साहन भत्ता दिला आहे.

वीस वर्षांपूर्वी नवी मुंबई विमानतळाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. त्यासाठी २२६८ हेक्टर भूभागाची आवश्यकता असून ११६० हेक्टर जमिनी ही प्रत्यक्षात धावपट्टी आणि टर्मिनल यासाठी वापरली जाणार आहे. सिडकोने या विमानतळासाठी उलवा टेकडीची उंची आठ मीटपर्यंत कमी करण्याचे काम गेल्या वर्षी सुरू केले असून विमानतळाच्या सपाटीकरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असल्याचा दावा सिडकोच्या वतीने केला जात आहे. दोन हजार कोटी रुपये खर्चाची धावपट्टीपूर्व कामे सुरू करण्यात आलेली आहेत.

दहा गावे व तीन हजार प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे मोठे आव्हान समोर आहे. ते जवळपास पूर्ण होत असून शेवटची चार गावे काही मागण्यांमुळे गाव सोडण्यास तयार नव्हती. त्यांचेही समाधान करण्यात सिडको यशस्वी होत असल्याने कोंबडभुजे, तरघर, उलवा, आणि गणेश पुरी या चार गावांतील बोटावर मोजण्याइतक्या प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर आता बाकी आहे. १५ जानेवारीपर्यंत राहते घर निष्कासित करून गाव खाली करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना प्रति चौरस ५०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला आहे.  एकीकडे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम करीत असताना दुसरीकडे धावपट्टी व टर्मिनलच्या उभारणीचे काम जीव्हीके लेड या बांधकाम कंपनीने हाती घेतले आहे. विमानतळाच्या दक्षिण बाजूकडील सहा गावे यापूर्वीच स्थलांतरित झाल्याने त्या बाजूने धावपट्टीबांधणीच्या स्तरांचे काम सुरू करण्यात आले आहे.

टर्मिनल डिझाइनचे काम लंडनमधील कंपनीला

प्रवासी टर्मिनलबांधणीचे काम येत्या दोन महिन्यांत सुरू करण्यात येणार असून सात महिन्यांत हे टर्मिनल पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्चाचे करणाऱ्या बांधकाम कंपनीने या ग्रीनफिल्ड विमानतळाच्या टर्मिनलचे डिझाइन लंडनमधील झहा हदिद कंपनीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न निकाली लागत असल्याने ही इमारत लवकर पूर्ण होईल, असा विश्वास मुख्य अभियंता राजेंद्र धायटकर यांनी व्यक्त केला.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ हा या क्षेत्राचा कॅटलिस्ट (उत्प्रेरक) प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामुळे या भागाचा आमूलाग्र बदल होणार असून इतर अनेक प्रकल्प येत्या काळात कार्यान्वित होणार आहेत. विमानतळाच्या सपाटीकरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असल्याने प्रवासी टर्मिनल येत्या सात ते आठ महिन्यांत पूर्ण करणे शक्य आहे.   – लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको.   

First Published on January 23, 2019 1:31 am

Web Title: international airport in navi mumbai 2