पोलीस आयुक्तांची बदली होणार नसल्याचे संकेत

नवी मुंबई पोलीस दलाचे आयुक्त हेमंत नगराळे यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश मंगळवारी मुंबईतून निघाल्याच्या वृत्ताला बुधवारी सायंकाळपर्यंत गृहविभागाने दुजोरा दिला नाही. नगराळे यांनी बुधवारी दिवसभर आपल्या कार्यालयातून कामकाज पाहिले. आमदार जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटले. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्वाक्षरी न केल्यामुळे त्यांचा नगराळे यांना अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे आणि त्यामुळे त्यांची बदली होणार नसल्याची चर्चा आहे.

यापूर्वीही उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी माफीनामा सादर करण्याची वेळ नगराळे यांच्यावर आली होती. नवी मुंबई पोलीस दलात पहिल्यांदाच पोलीस आयुक्तांवर ही नामुष्की ओढावली. शहरात ठिकठिकाणी व महामार्गावर सुरू झालेले जुगारासारखे काळेधंदे, पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार यामुळे नगराळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मंगळवारी रात्री त्यांच्या बदलीचे वृत्त वाऱ्यासारखे सर्वत्र पसरले.

आमदार जयंत पाटील हे संचालक असलेल्या बँकेतील गैरव्यवहाराचे पडसाद विधानपरिषदेत उमटल्यानंतर आमदारांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी विधानपरिषद अध्यक्षांची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र दोषारोपपत्र दाखल करताना विधिमंडळाच्या अध्यक्षांची परवानगी आवश्यक असते असेही नगराळे यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

विधिमंडळातील गोंधळानंतर नगराळे यांची बदली किंवा निलंबन होणार हे पक्के समजले जात असताना बुधवारी त्यांनी त्यांच्या दालनातून कामकाज केले. मुख्यमंत्र्यांचा पाठिंब्यामुळेच हे शक्य झाल्याचे बोलले जात आहे.

दीड महिन्यांपूर्वी गृहविभागातील बडय़ा अधिकाऱ्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षकांच्या बदल्या थांबविण्याचे आदेश मुंबईहून नवी मुंबईला द्यावे लागले होते. आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंदविल्यानंतर नगराळे यांच्या कामाच्या पद्धतीवर नवी मुंबईपासून ते मुंबईपर्यंत चर्चेला उधाण आले.

नगराळे यांच्या कार्यकाळात नवी मुंबई पोलीस दलाला पहिल्यांदा राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळाला. बँक ऑफ बडोदाचे दरोडा प्रकरण त्यांनी उघडकीस आणले, तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे रखडलेले काम हे नगराळे यांच्याच काळात मार्गी लागले, परंतु या तीन कामांव्यतिरीक्त प्रशासकीय कामात कोणतीही उल्लेखनीय कामगिरी नगराळे यांच्या कार्यकाळात झालेली नाही.

अवैध धंदे वाढल्याचा आरोप

  • नगराळे यांच्या कार्यकाळात नवी मुंबई परिसरातील अवैध धंदे वाढले आहेत. तत्कालिन पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या कारकिर्दीत नवी मुंबईत बंद झालेल्या काळ्या धंद्यांना नगराळे यांच्या काळातच चालना मिळाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
  • पनवेल मुंब्रा महामार्गावर दिवसा उजेडी ‘लाल काला पिला’ म्हणज जुगाराचा धंदा पनवेलपासून ते कळंबोलीपर्यंत राजरोस सुरू आहे.
  • नगराळे यांच्या पोलीस आयुक्तपदाच्या कार्यकाळात कंटेनर थांबविण्याचे अधिकार पोलिसांकडून काढून उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना सोपविले. त्यामुळे मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्यास त्यांना नवी मुंबईत नेमके काय अपेक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.