सतरा प्लाझा परिसरात कुंपण घालण्याचा प्रस्ताव मंजूर

प्रदीर्घ कारवाईनंतरही पामबीच मार्गावरील सतरा प्लाझा परिसरात सुरू असलेल्या बेकायदा वाहन पार्किंगला चाप न बसल्याने पालिकेने आता येथे लोखंडी जाळीचे कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव मंजूर झाला असून निविदाही मागवण्यात आल्या आहेत.

बेकायदा वॅलेट पार्किंगमुळे सतरा प्लाझा परिसरात वाहतुकीचा खेळखंडोबा झाला होता. या समस्येचा ‘लोकसत्ता’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महापालिकेने या परिसरातील बेकायदा पार्किंग आणि त्याला कारण ठरणाऱ्या व्यावसायिकांवर दीर्घकाळ कारवाई केली, एक किलोमीटर परिसरात नो पार्किंगचे फलक लावले, मात्र वाहतूक विभाग किंवा पालिकेच्या कर्मचाऱ्यांची पाठ फिरताच स्थिती जैसे थे होत असे. यावर उपाय म्हणून व्यावसायिकांनी पाम बीच मार्गावर काढलेली बेकायदा प्रवेशद्वारे कायमची बंद व्हावीत यासाठी रस्त्याच्या बाजूला भिंत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होत, मात्र आता भिंतीऐवजी लोखंडी जाळीचे कुंपण लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भिंत बांधण्यापेक्षा जाळी बसवण्यास कमी खर्च येणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अभियंता विभागाने दिली.

सतरा प्लाझामध्ये वाहन विक्री आणि दुरुस्तीची दुकाने आहेत. परिसरात असलेली वेअर हाऊस, विविध हॉटेल, मॉलचे प्रवेशद्वार आराखडय़ानुसार पामबीचच्या बाजूला नसून ते मागील बाजूला आहे. तरीही व्यवसायिकांनी दुकानांचे प्रवेशद्वार पामबीचच्या बाजूला तयार केले आहे. त्यामुळे रस्त्यावर दुहेरी पार्किंग केले जात आहे. यावर चाप बसवण्यासाठी आता परिसरात पटेल चौकापासून ते कोपरी सिग्नलपर्यंत लोखंडी कुंपण घातले जाणार आहे, निविदाही मागवण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता मनोज पाटील यांनी दिली.

असे असेल कुंपण

* पटेल चौक ते कोपरी सिग्नलपर्यंत

* १ किलोमीटर परिसर

* सतरा प्लाझाच्या दिशेने पदपथाच्या आतील बाजूला

* १७.७७ लाखांची निविदा

भिंतीचा खर्च अधिक असल्याने लोखंडी जाळीचे कुंपण घालण्यात येणार आहे. त्यामुळे बेकायदा पार्किंगचा आणि बेकायदा प्रवेशद्वारांचा प्रश्न निकाली निघणार आहे.

– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका