नवीन पनवेल, कळंबोलीत पाच दिवस अनियमित पाणीपुरवठा

सीमा भोईर पनवेल

सिडकोच्या पाणीकपातीचे परिणाम नवीन पनवेल व कळंबोली परिसरात जाणवू लागले आहेत. डोक्यावर हंडा आणि हाती बादल्या घेऊन पाणी भरण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शनिवारी दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद केला, रविवारी खोपोली येथील टाटा पॉवरचा वीजपुरवठा बंद असतो, सोमवारीही पाणी पुरवठा करण्यात आला नाही. मंगळवारी भोकरपाडय़ात वीज खंडित झाली व पाण्याचा दाब कमी असल्याने बुधवारीही परिस्थिती जैसे थे राहिली, त्यामुळे सिडको वसाहतीतील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.

नवीन पनवेल, खांदेश्वर, कामोठे, कळंबोली, करंजाडे, नावडे, तळोजा, खारघर, उलवे, द्रोणागिरीला २०० दशलक्ष घनलिटर पाण्याची आवश्यकता आहे, मात्र तेवढय़ा प्रमाणात पुरवठा केला जात नाही.

नवीन पनवेल, कळंबोली येथे गेल्या ३० वर्षांपासून सिडको वसाहतीत आहेत, मात्र तिथे पाणी साठविण्यासाठी सिडकोने जागा दिलेली नाही. पूर्वी २४ तास पाणी पुरविले जात होते. नंतर ते सहा तासांवर आले. पाणीपुरवठय़ाचा वेळ आणि पाण्याचा दाब हळूहळू अत्यंत कमी करण्यात आला. आता सिडको वसाहतीत पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्यांना तळ मजल्यावरून पाणी भरावे लागत आहे. एमजेपीकडून पाताळगंगा नदीतील पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते आणि तिथून नागरिकांपर्यंत पोहोचवले जाते. भोकरपाडा व ते पनवेल दरम्यान जलवाहिनी जीर्ण असून ती वारंवार फुटते. एमजेपीकडून वारंवार पाणीपुरवठा खंडित केला जातो. या वाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव असूनही त्या बदलण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांत नाराजी आहे.

एकीकडे स्मार्ट सिटीकडे कूच करत असल्याचा दावा आणि दुसरीकडे डोक्यावर पाण्याचे हंडे ही परिस्थिती फारच गंभीर आहे. सिडकोच्या नियोजनशून्यतेचा फटका आता सामान्य नागरिकांना बसत आहे.

– संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष

तांत्रिक अडचणींमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे, लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल. वसाहतींत पाणी साठवण्याची सोय नाही. वितरणात अडचणी नाहीत. तांत्रिक अडचण दूर होण्यास दोन दिवस लागतात. लोकांनी परिस्थिती समजून घ्यावी.

– दिलीप बोकाडे, कार्यकारी अभियंता, सिडको