पालिकेकडून आगरी कोळी भवन, समाजमंदिरात व्यवस्था

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने कोनसावळे-रसायनी रोड, पनवेल येथे एकूण एक हजार घरे ताब्यात घेत अलगीकरण केंद्र तयार केले आहे. या ठिकाणी आणखी दोन हजार घरे घेण्याचे नियोजन होते. मात्र, हे केंद्र शहराबाहेर असल्याने येणाऱ्या अडचणी पाहता आता शहरातील आगरी कोळी भवनासह पालिकेच्या समाजमंदिरात अलगीकरणाची व्यवस्था केली जाणार आहे.

नवी मुंबई शहरात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या ७००पर्यंत गेली असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. शहराच्या आठही विभागात सातत्याने करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे पालिकेने अलगीकरणासाठी अतिरिक्त घरांची व्यवस्था कोनसावळे पनवेल येथील इंडिया बुल्सच्या १८ मजली इमारतींमध्ये केली होती. मात्र त्याठिकाणी असलेल्या अडचणींबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. तसेच तेथून रुग्ण पळून जाण्याचे प्रकारही घडले आहेत. पालिकेला सुविधा पुरविण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे अतिरिक्त घरांची गरज पडल्यास त्यांचा वापर होणार आहे. याला पर्याय म्हणून शहरातच अलगीकरणाची आणखी व्यवस्था करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे.

४५० खाटा

आगरी कोळी भवन येथे १२० खाटा तसेच महापालिकेच्या समाजमंदिरांत ऐरोली, कोपरखरणे  १०० खाटा, वाशी १३८, तर नेरुळ येथे १०० खाटांची व्यवस्था केली जाईल.