वाढीव चटई निर्देशांकामुळे रहिवाशांना पुनर्विकासाचे वेध

नवी मुंबई : शासनाने नवीन बांधकाम विकास नियमावली जाहीर केल्यानंतर नवी मुंबईतील सिडकोच्या जुन्या घरांचा पुनर्विकासाचा रखडलेला प्रश्न मार्गी लागत आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे धोकादायक घरांत राहून वैतागलेले रहिवासी आपले घर विकून दुसरीकडे जात होते. ते व्यवहार आता थांबले असून या रहिवाशांना मोठय़ा घरांचे स्वप्न पडले आहे.

वाशी उपनगरासह शहरातील सिडकोनिर्मित घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेल्या तीस वर्षांपासून प्रलंबित होता. नवीन नियमावली लागू झाल्याने नेरुळ येथील दत्तगुरू या पहिल्या सोसायटीला २.५ चटई निर्देशांकानुसार पुनर्विकासाची पहिली परवानगी मिळाली तर वाशीतील एकता सोसायटीला ४.८ वाढीव चटई निर्देशांक मंजूर झाला आहे. यामुळे येथील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वाशी येथील जेएन १ व जेएन २ या वसाहतींसह सेक्टर ९, १०, १६ येथील सिडकोच्या जुन्या घरांच्या पुनर्विकासाला आता गती मिळणार आहे.

या ठिकाणचे नागरिक इमारती धोकादायक झाल्याने गेली अनेक वर्षे पुनर्विकास होईल याची आस धरून होते. मात्र याबाबत वारंवार आश्वासने दिल्यानंतरही काही होत नव्हते. वर्षांनुवर्षे अडीच एफएसआयकडे डोळे लावून बसलेल्या अनेकांनी सिडकोने ना हरकत प्रमाणपत्र देणे बंद केल्यानंतरही मुखत्यारपत्र देऊन रोखीने घरांचे व्यवहार सुरू केले होते. मात्र राज्य शासनाने नुकतीच नवीन बांधकाम विकास नियमावली जाहीर केल्यानंतर नवी मुंबईतील पुनर्विकासाला चालना मिळाली आहे. अडीचऐवजी आता येथील इमारतींना ४.८ इतका वाढीव चटई निर्देशांक मंजूर होत आहे. त्यामुळे पूर्वीच्या घरापेक्षा मोठे व उत्तुंग इमारतीत आता त्यांना घर मिळणार आहे. त्यामुळे घराची विक्री करण्यापेक्षा पुनर्विकासाची रहिवासी वाट पाहात आहेत.  अनेक वर्षे पुनर्विकास होत नसल्याने येथील रहिवासी घर विक्री करीत होते, परंतु एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू झाल्याने पुनर्विकासातून मोठे घर मिळणार असल्याने प्रतीक्षेत आहोत, असे कैलास सोसायटीतील रहिवासी नितीन तरडे यांनी सांगितले. अनेक सोसायटय़ांना लवकरच परवानगी मिळणार असल्याचे नगरसेवक  किशोर पाटकर यांनी सांगितले.

यवाद रंगणार

नवी मुंबईत मागील ३० वर्षांपासूनचा वाढीव एफएसआय अनेक निवडणुकांत प्रचाराचा मुद्दा राहिला होता. आता पालिका निवडणुका तोंडावर असून या निवडणुकीत वाढीव चटई निर्देशांकाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी व भाजपमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगणार आहे.

वाशी विभागातील अनेक सोसायटय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात घरे विकली जात होती, परंतु आता वाढीव चटई निर्देशांकामुळे अनेक सोसायटय़ा पुनर्विकास करण्यास तयार होत आहेत. जुन्या सिडकोच्या घरांची विक्री व्यवहार थांबले आहेत.

-अतुल कुलकर्णी, अध्यक्ष, महालक्ष्मी सोसायटी, सेक्टर १० वाशी