X
निवडणूक निकाल २०१७

कुटुंबसंकुल : प्लास्टिकची पिशवी हद्दपार

नेरुळ सेक्टर १८ येथे १९९५ साली जलकिरण संकुल स्थापन करण्यात आले.

जलकिरण को-ऑ.हा.सो. नेरुळ, सेक्टर १८

प्लास्टिक पिशव्यांच्या वापराचे दुष्परिणाम सगळेच जाणतात, मात्र प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता राहणे अनेकांना अशक्य वाटते. अशा स्थितीत अख्खी वसाहतच प्लास्टिकमुक्त करणे किती कठीण असेल? पण नेरुळ येथील जलकिरण संकुलाने हे आव्हान पेलले आहे.

नेरुळ सेक्टर १८ येथे १९९५ साली जलकिरण संकुल स्थापन करण्यात आले. सुरुवातीपासूनच या संकुलातील रहिवासी विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवत आहेत. पूर्वीपासूनच येथे कचरा वर्गीकरण केले जाते. नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ नवी मुंबई आणि प्लास्टिकमुक्त नवी मुंबई मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत शहर स्वच्छ ठेवण्याचे आणि प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांचा वापर टाळण्याचे आवाहन रहिवाशांना करण्यात आले आहे. प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्यांवर पालिका वेळोवेळी छापे टाकून दंडात्मक कारवाई करत आहे. त्या पाश्र्वभूमीवर जलकिरण संकुलाने पुढाकार घेत आपल्या संकुलात काटेकोर प्लास्टिकबंदी लागू केली आहे.

संकुलात कचरा वर्गीकरण केले जाते. या कचऱ्यात प्लास्टिकच्या पिशव्या टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. संकुलातील राहिवाशांनी प्लास्टिकच्या पिशवीतून कचरा आणल्यास किंवा त्यांनी आणलेल्या कचऱ्यात प्लास्टिकची पिशवी आढळल्यास त्यांना तो कचरा सोसायटीच्या कचराकुंडीत टाकू दिला जात नाही. आपल्या प्लास्टिकच्या पिशव्यांची विल्हेवाट कशी लावावी, हे ज्याने-त्याने ठरवावे, असा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे सोसायटीचे सदस्य कोणतीही वस्तू खरेदी करताना प्लास्टिकची पिशवी नाकारतात. त्यामुळे प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सहजरीत्या होत आहे.

सोसायटीत विविध धर्माचे आणि प्रांतांचे सण-उत्सव उत्साहात साजरे केले जातात. नवत्रोत्सव, दसरा, दिवाळी, लोहडी, पोंगल, नाताळ असे सण साजरे करण्यात येतात. याव्यतिरिक्त भोंडलाही खेळला जातो. मधोमध हत्तीचे चित्र किंवा मूर्ती ठेवून महिला व मुली त्याभोवती फेर धरतात आणि पारंपरिक गीते गातात.

संकुलात वाहनांच्या पार्किंगसाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पार्किंमध्ये विस्कळीतपणा दिसत नाही. संकुलात वेगळे उद्यान नाही, मात्र कमी जागेत योग्य नियोजन करून मुलांना खेळण्यासाठी तसेच मोठय़ांना बसण्यासाठी सोय करण्यात आली आहे. संकुलाच्या संरक्षक भिंतीभोवती झाडे लावण्यात आली आहेत आणि तिथेच सहा फूट जागेत संगमरवरी कट्टे बांधण्यात आले आहेत. त्यावर सोसायटीतील रहिवासी गप्पांत रंगलेले दिसतात. स्वच्छ, सुनियोजित संकुलातील रहिवाशांत एकोपा निर्माण झाला आहे.

एक घर, एक झाड

गेल्या दोन वर्षांपासून येथील रहिवाशांनी वृक्षारोपणास सुरुवात केली आहे. या संकुलात एकूण ९६ कुटुंब वास्तव्यास आहेत. दर वर्षी १५ ऑगस्टला प्रत्येक कुटुंब एक झाड लावते आणि वर्षभर त्या रोपटय़ाची काळजी घेते. इथे नारळ, अशोक आणि अन्य फुलझाडे मोठय़ा प्रमाणात लावण्यात आली आहेत.

Outbrain