|| विकास महाडिक

राज्य शासनाकडे पाठवण्याचा पालिकेचा निर्णय; ठाणे-जेएनपीटी मार्ग १० वर्षांत प्रत्यक्षात येण्याची शक्यता

उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)येथून होणारी अवजड वाहतूक सुकर व्हावी यासाठी नवी मुंबई खाडीलगत २७ किलोमीटर लांबीचा किनारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव नवी मुंबई पालिका लवकरच राज्य शासनाकडे पाठविणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना यापूर्वीच केल्या आहेत. यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आर्थिक सहकार्य करणार आहे. गुजरातहून जेएनपीटी बंदराकडे येणाऱ्या अवजड वाहनांचे प्रमाण मोठे आहे. ही वाहने सध्या ठाणे-बेलापूर व शीव-पनवेल महामार्गावरून ये-जा करतात.

उरण येथील जेएनपीटी बंदरामुळे नवी मुंबईतून मोठय़ा प्रमाणात अवजड वाहने ये-जा करतात. १५ वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या ‘असाईड’ या संस्थेने केलेल्या आर्थिक सहकार्यावर नवी मुंबई पालिकेने ठाणे-बेलापूर मार्गाचे सिमेंट क्राँक्रिटीकरण केले. या मार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत असल्याने नुकतेच एमएमआरडीएने दोन उड्डाणपूल बांधले. भविष्यात जेएनपीटी बंदराचा विस्तार होणार असून साडेचार हजार कोटींचा नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यात माणगाव येथील दिघी बंदराचादेखील विस्तार होत आहे. जेएनपीटी बंदरावरील ताण कमी व्हावा यासाठी केंद्र सरकार हा विकास करत आहे. त्यामुळे केवळ बंदरावर जाणाऱ्या जड वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढणार असल्याने राज्य सरकार किनारी मार्गाचा जास्तीत जास्त विकास करण्याचा विचार करत आहे. नवी मुंबई पालिकेने खाडी मार्गाचा एक विकास आराखडा चार वर्षांपूर्वी तयार केला आहे. पालिकेचे तात्कालीन शहर अभियंता व विद्यमान अतिरिक्त आयुक्त मोहन डगावकर यांच्या संकल्पनेतून या मार्गाचा एक आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी महापे येथील भुयारी मार्गाचे व रबाळे-घणसोली उड्डाणपूलाचे उद्घाटन करण्यासाठी नवी मुंबईत आले होते. त्या वेळी त्यांनी नवी मुंबईत किनारी मार्गाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले होते.

नवी मुंबई पालिकेचा आराखडा वाशीपासून ठाण्यापर्यंत मर्यादित आहे. केंद्र सरकार बंदरावर जाणारी वाहतूक शहरापासून वेगळी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे हा मार्ग वाशीपासून पुढे जेएनपीटीपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे ते जेएनपीटी या २७ किलोमीटर लांबीच्या किनारी मार्गाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम नवी मुंबई पालिकेवर येणार आहे. या मार्गातील चार मार्गिकांवर अडीच हजार कोटी तर आठ मार्गिकांवर पाच हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. यासाठी एमएमआरडीए, केंद्र सरकारचे आर्थिक सहकार्य मिळणार आहे. ठाणे-बेलापूर व शीव-पनवेल महामार्गावरील कंटनेरची वाहतूक वळविली जाणार आहे. हा मार्ग प्रत्यक्षात येण्यास १० वर्षे लागणार आहेत. या कामासाठी सागरी नियंत्रण किनारा नियम व पर्यावरणाच्या अनेक पायऱ्या पार कराव्या लागणार आहेत.

शहरातील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून नवी मुंबई पालिकेने ऐरोली ते वाशी या खाडी मार्गाचा विकास आराखडा यापूर्वीच तयार केला आहे. राज्य सरकारने जेएनपीटीची गरज लक्षात घेऊन सागरी मार्गाचा पर्याय पुढे केला आहे. त्यामुळे हाच मार्ग वाशीपासून पुढे जेएनपीटी व ठाण्याच्या बाजूस तयार केला जाणार आहे. यावर कमीत कमी अडीच हजार तर जास्तीत जास्त पाच हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.     – डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई पालिका