मत्स्य विभागाकडून सर्तकतेचा इशारा

अलिबाग आणि उरणमधील किनाऱ्यांवर मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारचे मासे आढळल्यानंतर आता अलिबागमधील रेवस व मांडवा तसेच उरण परिसरात जेली फिश दिसू लागले आहेत. या माशांचा दंश अतिशय वेदनादायक असतो. त्यामुळे किनाऱ्यावरील रहिवासी आणि मासेमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. समुद्रातील बदलत्या वातावरणामुळे हे मासे किनाऱ्यावर आले असावेत, असे मत मत्स्य विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे. किनारपट्टीवरील रहिवाशांना आणि पर्यटकांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात जेल फीश येतात. त्यांचा उपद्रव माणसांना होऊ नये, म्हणून शासकीय यंत्रणा उपाययोजना करते. अशाच प्रकारचे जेली फिश सध्या रायगड जिल्ह्य़ातील अलिबागच्या मांडवा, रेवस आणि उरणच्या करंजा परिसरात आढळत आहेत.

३० सप्टेंबरपासून समुद्रकिनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात विविध जातींचे मासे येऊ लागले होते. समुद्राच्या तळाशी होत असलेल्या उलथापालथीचा हा परिणाम असल्याचे जाणकार मच्छीमार तसेच मत्स्य विभागाकडूनही सांगण्यात आले होते. अशा प्रकारच्या घटना वर्षांतून किंवा दोन वर्षांतून एकदा होतात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात खोल समुद्रातील मासळी किनाऱ्यावर येते व ती सहजपणे पकडता येते. परंतु या घटनेनंतर धोकादायक समजले जाणारे जेली फिश किनाऱ्यावर दिसू लागले आहेत.

समुद्रातील परिस्थितीत बदल झाल्याने जेली फिश किनाऱ्यावर आले असावेत. हे मासे अलिबाग परिसरात काही प्रमाणात आढळत असले, तरी येथील मच्छीमारांना त्यांची माहिती आहे. त्यांचा स्पर्श मानवी शरीराला होऊ दिला नाही, तरा त्यांचा त्रास होत नाही. नागरिकांनी या माशांपासून सावध रहावे.

अविनाश कोळी, साहाय्यक आयुक्त, रायगड जिल्हा मत्सव्यवसाय विभाग