जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित साडेबारा टक्के विकसित भूखंडांना सीआरझेड लागू असल्याने भूखंडवाटपाचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर उपाय म्हणून जेएनपीटीने उरण-पनवेल राज्य महामार्ग क्रमांक ५४ वरील दास्तान फाटा व रांजणपाडा दरम्यानचा भूखंड देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी या भूखंडावर मातीचा भराव करून तो विकसित करण्यात येणार असल्याचे संकेत जेएनपीटीने दिले आहेत. नवीन भूखंड हा मोक्याच्या जागी असून याच परिसरात सी लिंक, दोन राष्ट्रीय महामार्ग तसेच जासईसारखे जंक्शन आहे. केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांसाठी फुंडे गावाच्या परिसरात १११ हेक्टरचा भूखंड आरक्षित केला होता. या भूखंडाचे प्रातिनिधिक स्वरूपाचे वाटप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १६ ऑगस्ट २०१४ ला करण्यात आले. मात्र आरक्षित भूखंडावर सीआरझेड असल्याने भूखंड वाटपात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे ११ ऑक्टोबर २०१५ च्या जेएनपीटी भेटीत प्रकल्पग्रस्तांनी मोदी यांना काळे झेंडे दाखविले होते. त्यानंतर सीआरझेड उठविण्याच्या हालचाली सुरू होऊन जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी प्रकल्पग्रस्तांना दोन महिन्यांत भूखंडाचे वाटप करण्याचे आश्वासन दिलेले होते. सध्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या वारसांच्या नोंदी करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. त्याच दरम्यान सीआरझेडची समस्या निर्माण झाल्याने जेएनपीटीने यापूर्वी सुचविलेला व प्रकल्पग्रस्तांचाही मागणी असलेला दास्तान फाटा येथील मोक्याचा भूखंड साडेबारा टक्केसाठी देण्याचे संकेत मिळाले आहेत. या संदर्भात जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापक व सचिव डी. नरेश कुमार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.