खासदार राजू शेट्टी यांच्याकडे नेतृत्व
जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित साडेबारा टक्के विकसित भूखंडाच्या मागणीसाठी सोमवारी करळ फाटा येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली.
या मोर्चामुळे जेएनपीटीसह येथील जीटीआय व एनएसआयसीटी या तीनही बंदरांच्या कामकाजावर परिणाम झाला होता. त्यामुळे दररोज दुथडी भरून वाहनाने वाहणारे रस्ते ओस पडल्याने शुकशुकाट पसरला होता. या वेळी जेएनपीटीच्या अध्यक्षांना पुन्हा एकदा आश्वासन दिले आहे.
सोमवारी सकाळी करळ फाटा येथे जमलेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांनी साडेबारा टक्के आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, आता नाही तर कधीच नाही. प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचा विजय असो अशा जोरदार घोषणा देत मोर्चा काढला. हा मोर्चा चांदणी चौकात आल्यानंतर झालेल्या सभेसमोर बोलताना राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करीत शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सरकारला दिल्या मात्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचे सांगितले. याची किंमत सरकारला मोजावी लागेल, विकासाच्या नावाने सर्वसामान्यांना चिरडून मनोरे उभे करू नका असा इशारा देत, सरकारच्या टोल धोरणावरही त्यांनी टीका केली.
तसेच शेतकऱ्यांचा विश्वासघात करीत त्यांची मान कापण्यात आल्याचीही खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी २०१४ ला येऊन येथील शेतकऱ्यांना जी इरादा पत्र दिली आहेत. ती संसदेत मी फडकविण्यापूर्वी हा प्रश्न सोडविण्याचाही इशारा दिला.
या वेळी सदाभाऊ खोत, कामगार नेते भूषण सामंत यांचीही भाषणे झाली. त्यानंतर जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्याशी झालेल्या शिष्टमंडळाच्या चर्चेत पुढील नऊ महिन्यांत भूखंडाचे वाटप करण्याचे तसेच १११ हेक्टरसाठी दोन ऐवजी अडीचचा चटईक्षेत्र मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.