सर्वपक्षीय संघर्ष समितीला जेएनपीटी अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांचे आश्वासन
जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के विकसित भूखंडावर चर्चा करण्यासाठी जेएनपीटी प्रशासन भवनात बुधवारी झालेल्या बैठकीत जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी जासई व रांजणपाडा येथील भूखंड साडेबारा टक्केसाठी देण्याचे आश्वासन दिले आहे.
यासाठी समितीकडून या भूखंडाला सहमती देणारे पत्र दिल्यानंतर भूखंडाच्या विकासाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे पुन्हा एकदा जेएनपीटी साडेबारा टक्केच्या भूखंडाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दोन वर्षांच्या तीव्र आंदोलनामुळे केंद्र सरकारने २०१२ ला जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंडाला मंजुरी दिली. मात्र फुंडे परिसरात देण्यात आलेल्या १११ हेक्टर भूखंड सीआरझेड -२ मध्ये मोडत असल्याने भूखंड वाटपाचा प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जेएनपीटीचे अध्यक्ष डिग्गीकर यांनी पुढाकार घेऊन जासई व रांजणपाडामधील भूखंड देण्याची तयारी दर्शविली होती. या भूखंडाच्या बदलासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची पुन्हा संमती लागेल का अशी शंका होती. ही शंका दूर करीत अध्यक्षांनी सर्वपक्षीय समितीने मागणी केल्यास भूखंड देण्याची तयारी असल्याचे या बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे येत्या काही महिन्यांतच भूखंड हाती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या वेळी सर्वपक्षीय समितीने भूखंड विकसित करीत असताना प्रकल्पग्रस्तांना इरादापत्राचेही वाटप करण्याची मागणी केली.
या वेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, उरणचे आमदार मनोहर भोईर, जे. एम. म्हात्रे, कामगार नेते श्याम म्हात्रे, भूषण पाटील,महेंद्र घरत, गोपाळ पाटील, प्रशांत पाटील, सुरेश पाटील तसेच सर्वपक्षीय समितीचे निमंत्रक अतुल दि. पाटील हेही उपस्थित होते.

सोन्याचा भूखंड
जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंडासाठी जासई व रांजणपाडा येथील उरण- पनवेल रस्त्यालगतचा भूखंड यापूर्वी मंजूर करण्यात आलेला होता. त्यामुळे चार वर्षांपूर्वी याच भूखंडावर प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या हस्ते फलकही बसविण्यात आला होता.या भूखंडाला दोन राष्ट्रीय महामार्ग, न्हावा शिवडी सागरी सेतू, नवी मुंबई विमानतळ व उरण- पनवेलमधील मध्यवर्ती ठिकाण यामुळे अधिक महत्त्व असून हा भूखंड म्हणजे प्रकल्पग्रस्तांच्या हाती पडणारा सोन्याचा तुकडा असणार आहे.