वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे आंदोलन

उरण : गेली ३५ वर्षे लढा देऊनही  पुनर्वसनाची मागणी पूर्ण होत नसल्याने जेएनपीटी बंदरामुळे विस्थापित झालेले वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी शुक्रवारी सुमद्रात आंदोलन करीत जेएनपीटीची जहाजे अडविली. जेएनपीटीने १७ हेक्टर जमीनीवर पुनर्वसन करावे ही ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे.

२६ जानेवारी रोजीच हे आंदोलन करण्यात येणार होते मात्र महिनाभरात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने ते स्थगित करण्यात आले होते. मात्र यानंतरही जेएनपीटी भूमिकेवर ठाम राहिल्याने ग्रामस्थांनी शुक्रवारी सुमद्रात व रस्त्यावर दोन्ही ठिकाणी आंदोलन केले. शुक्रवारी पहाटेच ग्रामस्थ आपल्या होड्यांसह समुद्रात जात जेएनपीटीची मालवाहूजहाजांचा मार्ग रोखला. दुपारपर्यंत एकही जहाज जेएनपीटीत येऊ दिले नाही. दरम्यान पोलिसांनी गावातील व सुमद्रातील आंदोलकांना ताब्यात घेत जेएनपीटी कामगार वसाहतीमध्ये स्थलांतरित केले. त्यानंतर जेएनपीटीचे उपाअध्यक्ष उन्मेष वाघ यांच्याशी ग्रामस्थांशी चर्चा झाली. त्यात पुर्नवसनाचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र हे आंदोलन स्थगित करण्यात आले नसून सुरूच राहणार आहे. गुरुवा्ररी जेएनपीटी प्रशासनाशी याबाबत बैठक होणार आहे. या बैठकीत होणाऱ्या निर्णयानंतर आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

जलवाहतुकीवर परिणाम : सुमद्रातील आंदोलनाचा मोरा ते मुंबई दरम्यानच्या जलवाहतुकीवरही परिणाम झाला. पोलिसांनी जलवाहतूक बंद ठेवल्याने मोरा येथून मुंबईत जाणाऱ्या अनेक कामगारांना परत फिरावे लागले.

जेएनपीटी प्रशासनाशी चर्चा झाली आहे, मात्र आंदोलन मागे घेतले नाही. येत्या गुरुवारी बैठक घेण्यात येणार आहे. त्यात काय निर्णय होतो यानंतरच आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येईल. – सुरेश कोळी, अध्यक्ष, ग्रामसुधार मंडळ