६० हजार रोजगारनिर्मितीची शक्यता

जेएनपीटी परिसरात बंदरावर आधारित देशातील पहिल्या सेझ प्रकल्पाची उभारणी केली जात असून २७७ हेक्टर भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या या सेझ प्रकल्पाची सुरुवात लवकरच होणार असून सेझ प्रकल्पाच्या प्रथम चरणात किमान ६० हजार रोजगार उपलब्ध होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकल्पाची उभारणी वेगाने सुरू आहे. जेएनपीटीशेजारील करळ ते बेलपाडा या दोन गावांच्या मध्ये हा प्रकल्प उभारला जाणार आहे. नवी मुंबई विमानतळ तसेच रेल्वे मार्गाचे जाळे व राष्ट्रीय महामार्गाने हा प्रकल्प जोडला जाणार आहे. त्यांचीही कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर खुद्द केंद्रीय नौकानयमंत्री नितीन गडकरी तसेच केंद्र सरकारच्या विभागाकडूनही लक्ष दिले जात आहे.

उरण तालुक्यात अनेक औद्योगिक प्रकल्पांची उभारणी होत असून २८ वर्षांपूर्वी जेएनपीटी बंदराची उभारणी झाल्यानंतर या परिसरचा कायापालट झाला आहे. बंदरावर आधारित अनेक उद्योग व गोदामे सध्या येथे सुरू असून ५० हजारांपेक्षा अधिक कामगार या ठिकाणी काम करीत आहेत. या बंदराचा विस्तार वाढू लागला आहे. सध्या जेएनपीटीसह चार बंदरे कार्यान्वित झालेली आहेत. त्यांची क्षमता येत्या चार वर्षांत दुपटीने होणार आहे. ही क्षमता वाढविण्यासाठी जेएनपीटीने बंदरावर आधारित सेझची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेझमध्ये बंदरावर आधारित विविध उद्योगांची निर्मिती केली जाणार आहे. त्याकरिता कामगारांचीही भरती होणार आहे. ही कामे करण्यासाठी बंदराकडून अनेक कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्याची माहिती जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी दिली. तसेच सेझच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होण्यास काही महिन्यांचा अवधी असून त्यामुळे ६० हजारांपेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होणार असल्याचीही माहिती त्यांनी या वेळी दिली.