24 April 2019

News Flash

बँक ऑफ बडोदा दरोडा: वर्षभरानंतर आणखी एका आरोपीला अटक

जुईनगर सेक्टर- ११ येथील बँक ऑफ बडोदामध्ये १३ नोहेंबर २०१७ ला बँकेशेजारच्या दुकानातुन ५० फुट भुयार खोदून त्यातून बँक लॉकर रूममध्ये प्रवेश करत दरोडा टाकण्यात

संग्रहित छायाचित्र

नवी मुंबईतील जुईनगर येथील बँक ऑफ बडोदामध्ये २०१७ मध्ये पडलेल्या दरोड्यांप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी एकास अटक केली आहे. संजय कांबळी असे त्याचे नाव आहे. ठाणे ग्रामीण भागातील दरोड्यांप्रकरणी अटक केल्यावर चौकशीत त्याने जुईनगरमधील बँक ऑफ बडोदामध्ये टाकलेल्या दरोड्यातील सहभागाची कबुली दिली आहे. नवी मुंबई पोलीस त्याला ताब्यात घेणार असून एका वर्षात त्याने अन्य गुन्हेही केलेले उघडकीस येतील असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.

जुईनगर सेक्टर- ११ येथील बँक ऑफ बडोदामध्ये १३ नोहेंबर २०१७ ला बँकेशेजारच्या दुकानातुन ५० फुट भुयार खोदून त्यातून बँकेतील लॉकर रूममध्ये प्रवेश करत दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी बँकेतील ३१ लॉकर फोडून त्यातील तब्बल ३ कोटी ४३ लाख ४२ हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटून नेला होता. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी पंधरा दिवसांमध्ये तांत्रिक आणि गोपनिय माहितीच्या आधारे मुंबई शहरातील विविध भागातून या दरोडा प्रकरणात सहभागी असलेल्या हाजीद अली सबदर अली मिर्झा बेग उर्फ अज्जु उर्फ लंगडÎ (वय ४५), श्रावण कृष्णा हेगडे उर्फ संतोष तानाजी कदम उर्फ काल्या (वय ३७), मोमीन अमिन खान उर्फ पिंटू (वय २४), अंजन आनंद महांती उर्फ रंजन (वय ४३) या चौघांना गुह्यात वापरलेले वाहन आणि काही मुद्देमालांसह अटक केली व लुटलेले सोने विकत घेणारा सोनार, राजेंद्र वाघ याला अटक करुन त्याच्याकडून १७ लाख २५ हजार रुपये किंमतीचे १७४० ग्रॅम सोने जफ्त केले होते.

ठाणे ग्रामीण भागात दरोड्याप्रकरणी वळीव पोलीसांनी संजय कांबळी याला अटक केल्यावर त्याच्या चौकशीत तो नवी मुंबईतील बँक ऑफ बडोदा मध्ये टाकलेल्या दरोड्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कांबळी याला लवकरच नवीमुंबई पोलीस ताब्यात घेणार आहेत. बँक ऑफ दरोडा प्रकरणी कांबळी हा फरार आरोपी पैकी एक असून दरोड्यात गाडीची सोय करून देणे, भुयार खणण्यासाठी फावडे कुदळ टोपले असा साहित्य पुरवण्याचे काम त्याने केले आहे.त्याला वरिष्ठांच्या आदेशानुसार ताब्यात घेत पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज पाडवी यांनी दिली.

First Published on October 31, 2018 4:55 pm

Web Title: juinagar bank of baroda robbery case one more accused arrested