नवी मुंबई पोलीस आस्थापना मंडळ उमेदवारांना एक वाढीव गुण देणार
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी ७८ पदांसाठी झालेल्या लेखी परीक्षेनंतर नवी मुंबई पोलिसांनी जाहीर केलेल्या उत्तरतालिकेमध्ये (आन्सर की) एका प्रश्नाचे चुकीचे उत्तर असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे प्रश्नाचे बरोबर उत्तर दिलेल्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर या चुकीबद्दल एक गुण वाढीव देण्याचे नवी मुंबई पोलीस आस्थापना मंडळाने जाहीर केले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ७८ पोलीस पदांसाठी सुमारे १४ हजारांपैकी अधिक उमेदवारांनी अर्ज केले. २०९० उमेदवार शारीरिक चाचणीमध्ये पात्र ठरले. नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजल्यापासून ते १ वाजेपर्यंत १०० गुणांची परीक्षा उमेदवारांनी दिली. परीक्षेनंतर सायंकाळी नवी मुंबई पोलिसांनी http://www.navimumbaipolice.
org.in या त्यांच्या संकेतस्थळावर उत्तरतालिका प्रसिद्ध केली. प्रश्न क्रमांक ९४व्यामध्ये ‘विरुद्धअर्थी शब्द ओळखा’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. उमेदवारांना चार वेगवेगळे पर्याय उत्तरांच्या स्वरूपात देण्यात आले होते. या प्रश्नाचे अचूक उत्तर नवी मुंबई पोलिसांनी जाहीर केलेल्या उत्तरतालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे (बी) कलंक – काळिमा हे दर्शविल्याने घोळ झाला. ‘सी’ म्हणजेच आय – व्यय हे उत्तर बरोबर असतानाही हे चुकीचे उत्तर जाहीर झाल्याने उमेदवारांकडून वाढीव गुण देण्याची मागणी करण्यात आली. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या चुकीबद्दल वाढीव गुण देण्याचे जाहीर केल्याचे पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले.