पनवेल पालिकेच्या येत्या स्थायी समितीत रुग्णालय व्यवस्थापनावर निर्णय

पनवेल : सिडकोकडून लहान मुले व इतर रुग्णांसाठी कळंबोलीतील सीसीआय गोदामात करोना रुग्णालय उभारण्यात येत असून अंतिम टप्प्यात आहे. हे रुग्णालय पालिकेकडे लवकरच हस्तांतरित होणार असून पुढील आठवडय़ात स्थायी समिती बैठकीत यावर निर्णय होणार आहे. त्यामुळे पुढील २० दिवसांत ६५० खाटांचे हे रुग्णालय पालिकेच्या सेवेत दाखल होईल अशी शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यात सर्वाधिक गंभीर अवस्थेतील करोनाचे रुग्ण ऐनवेळी पनवेलमधील रुग्णालयांकडे धाव घेतात. त्यामुळे येथील मृत्युदर वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यत ९३ हजार रुग्ण तसेच पनवेल पालिका क्षेत्रात सध्या ६१,७०० तर ग्रामीण पनवेलमध्ये १८,८०० रुग्णांची संख्या पोहचली आहे. अजूनही जिल्ह्यची रुग्णसंख्या साडेचारशेवर आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी जिल्ह्याच्या केंद्रस्थानी पनवेल पालिका क्षेत्रात पनवेल पालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख व पालकमंत्री अदिती तटकरे यांनी करोना जम्बो सेंटर सुरू करण्याची मागणी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. पनवेलमधील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आग्रह धरला होता. त्यामुळे सिडकोने हे रुग्णालय बांधून देण्याचे आदेश देण्यात आले. ६०० खाटांचे रुग्णालय सीसीआय गोदामात सुरू होत असल्याने यामध्ये १०० खाटांचे इतर रुग्णांसाठी आणि ५० खाटा बालकांसाठी असा स्वतंत्र अतिदक्षता कक्ष असणार आहे. तर ५०० प्राणवायूच्या खाटा असणार आहेत.

हे रुग्णालय बांधण्यासाठी सिडको सुमारे १४ कोटी रुपये खर्च करत असून रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे रुग्णालय पालिकेकडे हस्तांतरण करून पनवेल पालिकेने हे रुग्णालय पुढील सहा महिन्यांकरिता तेथील डॉक्टर, कर्मचारी व इतर व्यवस्थापन हाताळायचे आहे. यासाठी सुमारे ७७५ वैद्यकीय मनुष्यबळाची गरज आहे. पालिकेला महिन्याला सुमारे ३ कोटी असे सहा महिन्यांसाठी १८ कोटी रुपये खर्च आहे. याबाबत पालिकेने नुकतेच निविदा जाहीर केली असून त्यानंतर रुग्णालय व्यवस्थापन कंपन्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला आहे. तांत्रिकदृष्टय़ा या निविदेला प्रशासनाने उघडल्यानंतर पनवेल पालिकेच्या पुढील आठवडय़ात होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर संबंधित कंपनीला सीसीआय गोदामातील जम्बो करोना सेंटर चालविण्याची जबाबदारी पनवेल पालिका देईल. सध्या महापालिकेची सर्व

मदार कामोठे येथील एमजीएम रुग्णालय, कळंबोली येथील सिडकोने बांधून दिलेल्या ७२ खाटांच्या रुग्णालयावर आणि पनवेल शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या खांद्यांवरच आहे.

या रुग्णालयाच्या वैद्यकीय व्यवस्थापनासाठी पालिकेने निविदा जाहीर केली आहे. या निविदा प्रक्रियेस प्रतिसाद चांगला लाभला असून स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल. सिडको मंडळाकडून रुग्णालय उभारणीचे काम अंतिम टप्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी करोना टाळण्यासाठी प्रशासनाने सांगितलेली त्रिसूत्रीचे पालन करणे मात्र गरजेचे आहे.

– सचिन पवार, उपायुक्त, पनवेल पालिका