दहा हजार पेटय़ा दाखल; कोकणातील बागायतदारांच्या संख्येत घट
कोकणातील एक-दोन बागायतदार वगळता मुंबईतील घाऊक फळ बाजारात हापूस आंबा पाठविणाऱ्यांची संख्या मंदावली असल्याने या आठवडय़ात कोकणातील हापूस आंबा शेवटचा रामराम करणार असे दिसून येत आहे. फळ बाजारात सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्य़ातील आंबेगाव जुन्नरच्या हापूस आंब्याची चलती असून सोमवारी या आंब्याच्या दहा हजार पेटय़ा बाजारात आल्याची नोंद आहे. आकाराने मोठा आणि चवीला कोकणातील हापूससारखा असलेला हा आंबा आकाराप्रमाणे १०० रुपयांपासून ते ३५० रुपये प्रति डझन आहे. कर्नाटकी हापूस आंब्याने घातलेला पिंगा आता मंदावला असून या आंब्याची मागणी घटली आहे. गुजरातचा केसर सध्या गुजराती समाजावर गारुड घालत आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यातून सहा महिने विविध प्रकारचे हापूस आणि आंब्याचे प्रकार तुर्भे येथील घाऊक बाजारपेठेत येत असतात मात्र जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कोकणातील हापूस आंब्याची ऐट काही वेगळीच असल्याचे दिसून येते. या फळामुळे फळ बाजारातील झाडून सर्व व्यापारी अंग झटकून व्यापाराला लागत असून एकटय़ा या फळाचा व्यापार आणि इतर सर्व फळांचा वर्षांतील व्यापार एका बाजूला पडत असतो. त्यामुळे फळ व्यापाऱ्यांचीही या फळावर अधिक मेहरनजर असल्याचे दिसून येते. त्यामुळे जानेवारीमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू झालेली मुंबईतील कोकणातील हापूस आंब्याची आवक जूनमध्ये संपुष्टात येत असून यंदा कमी उत्पादनामुळे ही आवक रोडावल्याचे चित्र आहे. पावसाळा सुरू होण्यास आता काही तास शिल्लक राहिलेले असताना कोकणातील चिपळूणजवळील पोमेंडी गावातून कुमार चाळके यांच्या बागेतील काही हापूस आंबे बाजारपेठेत दाखल होत आहेत. हा अपवाद वगळता कोकणातील हापूस आंब्याचा मोसम संपला असून पश्चिम महाराष्ट्राने त्याची जागा घेतली आहे. पुणे जिल्ह्य़ातील आंबेगाव, जुन्नर येथील जमिनीला कोकणातील जमिनीचे वरदान लाभले असून या ठिकाणी मागील काही वर्षांपासून कोकणातील हापूस आंब्याची पुनरावृत्ती होत असल्याचे दिसून येत आहे.
१ जूनपासून सुरू झालेली ही आवक सोमवारी अचानक वाढली असून दहा हजारांपेक्षा जास्त पेटय़ा फळ बाजारात आल्याची माहिती हापसू आंबा व्यापारी व आंबेगावचे शेतकरी विजय बेंडे यांनी दिली. आकारमानाप्रमाणे दोन डझनापासून साडेतीन डझनांपर्यंत या पेटय़ा येत असून त्यांची किंमत ५०० ते ६०० रुपये प्रति पेटी आहे. त्यामुळे हा आंबाही १०० ते ३५० रुपये डझनाने विकला जात आहे. आंबेगाव जुन्नर हापूस आंब्याचा हा मोसम आणखी २०-२५ दिवस राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच वेळी कोकणातील हापूस आंब्याला टक्कर देणाऱ्या कर्नाटकी हापूस आंब्याची मागणी कमी झाली असून ३० ते ५० प्रति किलोने विकला जात आहे. गुजरातच्या केसरीचीही तीच दशा असून ६० रुपये किलोने हा आंबा गुजराती समाज विशेषत: खरेदी करीत आहे मात्र पाऊस पडल्यानंतर या फळाला तोंड लावले जाणार नाही.

फळ बाजारात तेजी
मंगळवारपासून सुरू होणाऱ्या रमजान महिन्यामुळे फळ बाजारात तेजी आली आहे. ज्या फळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त ती फळे या काळात जास्त विकली जात असून कलिंगड, टरबूज, पाइनापल, आणि पपईची मागणी वाढली आहे. रोजे सोडण्यासाठी मुस्लीम बांधव या फळांचा जास्त वापर करीत असल्याने ही मागणी वाढल्याचे बेंडे यांनी स्पष्ट केले.