पनवेल-सायन महामार्गावर खांदेश्वर येथे बेकायदा कलिंगड नाका हटविण्याची तयारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केली आहे. ही कारवाई प्रत्यक्षात आल्यास स्वस्त कलिंगडाची चव चाखता येणार नाही. महामार्गानजीक अतिक्रमणामुळे वाहनांची खांदेश्वर ते कळंबोली सर्कल यादरम्यान मोठी कोंडी होते.
किलगड व्यापारी आणि रोप विक्रेत्यांना तशा नोटिसा बजावण्यात येतील. त्यानंतर महिनाभरात पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटविण्यात येतील, अशी माहिती एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता संजय गागुंर्डे यांनी दिली.
या मार्गादरम्यान कळंबोली सर्कल ते खांदेश्वर या पल्ल्यावरील रस्तारुंदीकरणाच्या कामाला वेग येईल आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल. याचसोबत पनवेलमधील कलिंगड नाका अशी ओळख मिळविलेल्या खांदेश्वरची ओळखही नामशेष होणार आहे.
खांदेश्वर परिसरातून पनवेलकडे जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्याने येथे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. खांदेश्वर वसाहतीमध्ये शिरण्यासाठी या एकाच मार्गाचा वाहनचालक वापर करत असल्याने खांदेश्वरचे प्रवेशद्वारावर नेहमी वाहतूक कोंडीचे दर्शन होते. खांदेश्वर येथील सिग्नलवरील कोंडीमुळे पाच मिनिटांचा प्रवास हा पंधरा मिनिटांचा होतो. त्यामुळे अनेक वर्षांपासून या मार्गाचे रुंदीकरण झाल्यास हा प्रश्न निकाली निघेल या अपेक्षेने एमएसआरडीसी प्रशासनाने येथे काम सुरू केले. चार पदरी दुहेरी डांबरीकरणाचा रस्ता येथे बांधण्यात येणार आहे.
परिसरातील कलिंगड नाक्यावरील व्यापाऱ्यांनी अनेक वर्षांपासून जागा मिळण्याची किंवा पुनर्वसन करण्याची मागणी सरकारदरबारी केली होती. अद्याप त्या मागणीविषयी ठोस उपाययोजना होऊ शकली नाही. काहींनी या जमिनीवर पारंपरिक वापराची जागा सांगून हक्क सांगितल्याने याबाबत न्यायालयात खटलेही सुरू आहेत. यासाठी एमएसआरडीसी प्रशासनाने स्टय़ुप कन्सलिन्टग नावाच्या कंपनीला कायदेशीर सल्लागार म्हणून नेमले आहे. या कंपनीला कायदेशीर सल्ल्यासाठी एमएसआरडीसीने तीन वर्षांकरिता ६ कोटी ४२ लाख रुपये दिले आहेत. महिन्याला सुमारे २० लाख खर्च करून एमएसआरडीसीने स्टय़ुप कंपनीने दिलेल्या सल्ल्यानुसार कळंबोली ते पळस्पे फाटा या महामार्गादरम्यानच्या सुमारे ४८५ अतिक्रमण केलेल्या व्यापारी व खासगी मालकांना नोटिसा बजावल्या आहेत.
दिवाळी सणात या व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणावर एमएसआरडीसी प्रशासन हातोडा चालविणार होते. मात्र सणासुदीच्या काळात ही कारवाई पुढे ढकलण्यात आल्याचे एमएसआरडीसी सूत्रांकडून समजते. मात्र अजूनही पनवेल पळस्पे ते मुंब्रा महामार्गावरील रस्तारुंदीकरण न केल्यास याचा गंभीर परिणाम भविष्यातील वाहतूक कोंडीवर होऊ शकेल, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.