समुद्रमार्गाने अलिबागशी उरण जोडणार; धोकादायक प्रवासातून मुक्तता

स्थानिक मच्छीमारांनी आक्षेप घेतल्याने करंजा-रेवस या रो रो सेवेच्या जेट्टीचे काम काही महिन्यांपासून बंद होते.  मात्र हे काम पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले असून मार्च २०१९ पर्यंत ते पूर्ण होईल. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या अलिबागला जाण्यासाठी उरणमधील नागरिकांना रस्ता मार्गाने ४० किलोमीटर तर छोटय़ा होडीतून (जलमार्गाने) धोकादायक प्रवास करावा लागत आहे. या दोन्ही तालुक्यांना जोडण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून गोव्याच्या धर्तीवर रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.

विषेशत: मुंबईतील जलसेवा बंद झाल्यानंतर अलिबागमधील नागरिकांकडून याच मार्गाचा पर्याय म्हणून अवलंब केला जातो. त्यामुळे ही जलसेवा महत्त्वपूर्ण आहे. अलिबाग येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे इंधन व वेळेची बचत व्हावी तसेच अलिबाग व उरणमधील अंतर कमी व्हावे यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने १९ कोटी रुपये खर्चाची करंजा तर रेवस बंदरातून २५ कोटींच्या खर्चाच्या या दोन बंदराच्या दरम्यान रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.

या रो रोच्या जेट्टीसाठी निवडण्यात आलेल्या जागेमुळे कंरजा बंदरात नांगरण्यात येणाऱ्या मासेमारी बोटींवर परिणाम होऊन मच्छीमारांचे नुकसान होण्याच्या भीतीने करंजा येथील मच्छीमारांनी जेट्टीला विरोध केला होता. त्यामुळे हे काम रखडलेले होते. मात्र यामधून मेरिटाइम बोर्डाने मार्ग काढला आहे.

या संदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांच्याशी संपर्क साधला असता, करंजा जेट्टीच्या कामासाठी १९ कोटी उपलब्ध असल्याने त्याचे काम सुरू आहे. तर रेवस जेट्टीसाठी केंद्र सरकारकडे २५ कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. हा निधी लवकरच उपलब्ध होऊन मार्च २०१९ पर्यंत ही सेवा सुरू होईल