१४ संचालकांसह ७६ जणांविरुद्धही गुन्हा; ठेवीदारांना पैसे न मिळाल्याचा आरोप

नवी मुंबई : कर्नाळा बँक गैरव्यवहारप्रकरणी अखेर माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यावर फसवणूक आणि अपहारप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्य़ाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

कर्नाळा बँक गैरव्यवहारप्रकरणी बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळांवरील १४ सदस्यांसह एकूण ७६ जणांवरही गुन्हा दाखल झाला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ५१२ कोटी ५४ लाख ५३ हजार २८६ रुपयांचे कर्ज काढल्याप्रकरणी सहकार खात्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

गेले अनेक महिने ग्राहकांना बँकेतून पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. त्यानंतर खातेदार एकवटले गेले. या काळात आंदोलनेही झाली. काही दिवसांपूर्वी खारघर शाखेत खातेदारांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केले. तसेच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आंदोलन केले आणि याप्रकरणी पोलीस आयुक्तांना गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. मात्र हजारो ठेवीदारांचे पैसे अडकल्याने ग्राहकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत होते.

वारंवार मागणी करूनही ठेवीदारांना पैसे दिले जात नव्हते. या सर्व घटनांची दखल घेत सहकार खात्याच्या तक्रारीवरून कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील आणि बँकेच्या १४ संचालकांसह एकूण ७६ जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विवेक पाटील यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

या गैरव्यवहाराचा पूर्ण तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. कागदपत्र आणि संगणक विदेत (डाटा) फेरफार करणे, कट रचणे, पैसे हस्तांतरणात गैरकारभार करणे, फसवणूक केल्याबद्दल सहकारी संस्था अधिनियम ठेवीदार संरक्षक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. – अशोक दुधे, पोलीस उपायुक्त.