News Flash

कासाडी नदीत रसायन सोडणाऱ्यांना अटक

घातक रसायन महाड औद्योगिक वसाहतीमधील ‘हायकल’ कंपनीतून आणण्यात आले होते

(संग्रहित छायाचित्र)

 

महाडस्थित एका कंपनीमधील घातक टाकाऊ रसायन दोन टँकरद्वारे तळोजा येथील कासाडी नदीपात्रात सोडणाऱ्यांना शुक्रवारी मध्यरात्री पकडून स्थानिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. नदीपात्र प्रदूषित झाल्याने येथील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. हे घातक रसायन महाड औद्योगिक वसाहतीमधील ‘हायकल’ कंपनीतून आणण्यात आले होते.

कळंबोलीतील गुरुद्वाराशेजारील नागरिकांनाही या प्रदूषणाचा त्रास जाणवू लागल्याने स्थानिक तरुणांनी नदीपात्र प्रदूषित करणाऱ्यांवर गेल्या दोन आठवडय़ांपासून पाळत ठेवण्यास सुरुवात केली होती. शुक्रवारी मध्यरात्री या नदीपात्रात दोन टॅँकर रिकामे करण्यात येत असल्याचे या तरुणांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित हा प्रकार रोखत टँकर चालकांना पकडले आणि कळंबोली पोलिसांच्या स्वाधीन केले. राम आशीष, राम सुख यादव, पवनकुमार यादव अशी या टँकर चालकांची नावे आहेत. अशोक चंदानी आणि राजेशेठ अशी टँकरच्या मालकांची नावे असल्याची माहिती समोर आली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास तळोजा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

याबाबत स्थानिक तरुण आणि पर्यावरणप्रेमींनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, रात्रीच्या वेळी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता प्रदूषण मंडळाचे अधिकारी तळोजा पोलीस ठाण्यात दाखल झाले.

गुन्हा दाखल

या प्रकरणी तिन्ही टँकर चालकांविरोधात भादंसं २७७, २७८ पर्यावरण रक्षणाच्या कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापूर्वीही लोखंड बाजार, कळंबोली व तळोजा येथे अशाच प्रकारे घातक रसायनांनी भरलेले टँकर रिते करताना पकडले होते. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने हे प्रकार वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याबाबत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस दल आणि राष्ट्रीय हरित लवादाने स्थापन केलेली समिती तीन वर्षांपासून कासाडी नदीपात्र कोण दूषित करतोय, याचा शोध घेऊ शकली नाही. मात्र नागरिकांच्या सर्तकतेमुळे हा प्रकार उजेडात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 12:34 am

Web Title: kasadi river arrested for chemicals abn 97
Next Stories
1 एपीएमसीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व?
2 कोपरखैरणेत कोंडमारा
3 अमृत योजनेचे मंथन सुरूच
Just Now!
X