News Flash

खारघरच्या ‘गोल्फ कोर्स’चा कायापालट

याठिकाणी १८ ‘होल’चा गोल्फ कोर्स उभारण्यात येणार असून अन्य सुविधाही अद्ययावत करण्यात येणार आहेत.

 

आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळवण्यासाठी मैदानाची पुनर्रचना

खारघर येथे उभारण्यात आलेल्या ‘गोल्फ कोर्स’साठी कोटय़वधीचा खर्च केल्यानंतरही आंतरराष्ट्रीय तसेच मोठमोठय़ा स्पर्धानी या मैदानाकडे पाठ फिरवल्याने आता सिडकोने या ‘गोल्फ कोर्स’चे रूपडे पालटण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी याठिकाणी १८ ‘होल’चा गोल्फ कोर्स उभारण्यात येणार असून अन्य सुविधाही अद्ययावत करण्यात येणार आहेत. गोल्फ कोर्सच्या विस्ताराबरोबरच या ठिकाणचे क्लब हाऊस लवकरच खुले केले जाणार असून सदस्य नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे.

राज्यातील एक श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोने विमानतळ व गोल्फ कोर्स यासारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. मुबलक निर्सगसंपदा आणि मोकळी जमीन लाभलेल्या खारघर सेक्टर २३ व २४ जवळील डोंगराच्या दक्षिण बाजूस पांडवकडय़ाच्या पायथ्याशी १०३ हेक्टर जमिनीवर हा गोल्फ कोर्स उभारण्यात आला असून यातील २२ एकर जमीन ही वनविभागाची असल्याचे नंतर स्पष्ट झाल्याने या गोल्फ कोर्सच्या होल संख्येला मर्यादा आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पॅसिफिक कोस्ट डिझाइन कंपनीने या गोल्फ कोर्सचा आराखडा तयार केला असून १८ होलची रचना केली होती. वनविभागने आपली जमीन देण्यास स्पष्ट नकार दिल्याने सिडकोने हा गोल्फ कोर्स अध्र्याने कमी केला. सुमारे ५० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या गोल्फ कोर्सचे लोकार्पण डिसेंबर २०१३ रोजी आटपून घेण्यात आले. येथील वनविभागाच्या बदल्यात सिडको इतरत्र वनजमीन खरेदी करून देण्यास तयार होती मात्र त्यालाही वनविभाग तयार न झाल्याने होल संख्या कमी करण्याशिवाय सिडकोसमोर दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही. आंतरराष्ट्रीय दर्जासाठी कमीत कमी १८ होलचा गोल्फ असणे आवश्यक आहे. त्यामुळे या गोल्फ कोर्सचे उद्घाटन होऊन तीन वर्षे झाली तरी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा खेळल्या गेल्या नाहीत.

या आडमुठे धोरणाला आघाडी सरकारमधील काँग्रेस व राष्ट्रवादी संघर्षांची किनार असून सिडको हे महामंडळ राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या वनविभागाने जमीन देण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला होता.

त्यामुळे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प नवी मुंबईत कार्यान्वित होऊ शकला नाही. मात्र, आता या प्रकल्पाची पुनर्रचना करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे.  त्यानुसार याठिकाणी १८ (७१३७ यार्ड) गोल्फ होल राहणार आहेत. त्यामुळे या गोल्फ कोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत. त्यासाठी सिडको लवकरच या कोर्सची सदस्यनोंदणी व क्लब हाऊस सुरू करणार आहे.

खारघर व्हॅली गोल्फ कोर्सला आंतरराट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी त्याची येत्या तीन महिन्यांत पुनर्रचना केली जाणार असून लवकरच सदस्य नोंदणी सुरू केली जाणार आहे. येथील क्लब हाऊसही सदस्यांसाठी खुले केले जाणार आहे.

– भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 1:05 am

Web Title: kharghar golf course development
Next Stories
1 उरणमध्ये दोन शासकीय सिनेमागृहांसह नाटय़गृह
2 विद्रुपीकरणाचे दहन 
3 घर खरेदीसाठी मंदिरांच्या जाहिरातीचे तंत्र
Just Now!
X