अद्ययावत क्लब हाऊसचे काम पूर्ण; सदस्यांसाठी पाच, सात आणि दहा लाख रुपये शुल्क

नवी मुंबईच्या ऐश्वर्यात भर घालणारा खारघर येथील गोल्फ कोर्स १ एप्रिलपासून हंगामी सदस्यांसाठी खुला केला जाणार आहे. सध्या केवळ हौशी खेळाडूंना काही तासांसाठी शुल्क आकारून खेळण्याची मुभा दिली जात आहे. तिथे अद्ययावत क्लब हाऊस बांधून तयार झाल्याने पाच वर्षांसाठी हंगामी सदस्यत्व देण्यास सुरुवात केली जाणार आहे. ऑस्ट्रेलियन कंपनीने रचना केलेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोल्फ कोर्सवर सध्या ११ होल आहेत. याची १८ होलची रचना करण्यात आली होती, मात्र जवळच्या २२ हेक्टर जमिनीवर वनविभागाने आक्षेप घेतल्याने गोल्फ कोर्स छोटा करावा लागला.

मुंबईत ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ कोर्स’, ‘विलिंग्डन स्पोर्टस क्लब’, आणि ‘युनाएटेड सव्‍‌र्हिस क्लब’ असे तीन मोठे गोल्फ कोर्स आहेत. नवी मुंबईत सिडकोने खारघर येथे सह्य़ाद्री पवर्तरांगांच्या खाली पांडवकडय़ाजवळ १०३ हेक्टर जमिनीवर खारघर व्हॅली गोल्फ कोर्स फेब्रुवारी २०१२ रोजी सुरू करण्यात आला. या गोल्फ कोर्सवर ५० कोटी रुपये खर्च केले जाणार होते, मात्र वनविभाने २२ हेक्टर जमिनीवर आक्षेप घेतल्याने या गोल्फ कोर्सचा आकार कमी करावा लागला. त्यामुळे सिडकोने ३८ कोटी रुपये खर्च करून हे गोल्फ कोर्स उभारले. ऑस्ट्रेलिया येथील मेलबर्न शहरातील पॅसिफिक कोस्ट डिझाइनने या गोल्फ कोर्सची रचना केली आहे.

क्लब हाऊस आणि आलिशान सुविधा नसल्याने खेळाडू येथे येत नसत. सिडकोने हे क्लब हाऊस अद्ययावत केले आहे. ते चालवण्याचे काम एका खासगी संस्थेला दिले आहे. त्यामुळे पाच वर्षांसाठी पाच लाख रुपये आकारून हंगामी सदस्यत्व देण्यास सुरुवात केली जाणार आहे. गोल्फ कोर्स हा श्रीमंतांचा खेळ असल्याने या सदस्यत्वासाठीदेखील आरक्षण होईल अशी सिडकोला खात्री आहे. एक एप्रिलपासून हा गोल्फ कोर्स सदस्यत्व घेणाऱ्यांसाठी नियमित खुला केला जाणार आहे. सकाळी साडेसहाला खुले होणारे हा गोल्फ कोर्स सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांत सुरू ठेवला जाणार आहे.

शुल्करचना

आजवर केवळ दैनंदिन खेळाडूंना सोमवार ते शुक्रवापर्यंत ६०० रुपये आणि शनिवार व रविवारी १२०० रुपये आकारण्यात येत होते. विद्यार्थी, सिडको कर्मचाऱ्यांना सवलत असून शिकवणीसाठी वेगळे शुल्क आहे. परदेशी नागरिकांसाठी तिप्पट दर आकारण्यात आला आहे. आता सदस्यांसाठी पाच लाख, सात लाख आणि दहा लाख रुपये शुल्क निश्चित केले आहे. आजीव सदस्यत्व, सदस्यत्व आणि कॉर्पोरेट सदस्यत्व अशी वर्गवारी आहे.