नायलॉनच्या मांजावरील बंदीचे पक्षीप्रेमींकडून स्वागत; कागदी पतंगांच्या किमतीत २५ टक्के वाढ

मकर संक्रांतीच्या काळात मोठय़ा प्रमाणात होणारी पतंगबाजी आणि धारदार मांज्यामुळे पक्ष्यांना होणारी दुखापत हे नेहमीचे चित्र यंदा बदलणार आहे. नायलॉन मांज्यावर बंदी आल्यामुळे पक्ष्यांवरील संक्रांत टळली आहे. पक्षीअभ्यासक आणि पक्षीमित्रांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ग्राहकांनीही या निर्णयाला चांगला प्रतिसाद दिला आहे. नायलॉनला पर्याय ठरू शकणाऱ्या अन्य प्रकारच्या मांज्यांची मागणी वाढली आहे. कागदाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पतंगांच्या किमती सुमारे २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

गल्लीबोळांपासून थेट कॉर्पोरेट कार्यालयांपर्यंत सर्वत्र पतंगबाजीचा सराव सुरू झाला आहे. मोठय़ा पतंग उत्सवांप्रमाणेच लहान-मोठय़ा कार्यालयांतही पतंगबाजीच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पतंग, मांजा, चक्री अशा साहित्याने बाजार सजले आहेत. नायलॉन मांज्यामुळे पक्ष्यांना इजा होत असे, अनेकदा पतंग उडवणाऱ्याचेही बोट कापत असे. हे टाळण्यासाठी शासनाने पर्यावरण अधिनियम १९८६ च्या कलम ५ अन्वये नायलॉन मांज्यावर बंदीचे निर्देश दिले आहेत. घाऊक व किरकोळ व्यापारी तसेच साठवण करणाऱ्यांनी तत्परतेने साठवण व विक्री थांबवावी, असे निर्देश आहेत. नायलॉन मांज्यामुळे गुरांच्या आरोग्याला धोका निर्माण होणे, विद्युत उपकेंद्र बंद पडणे, विजेची उपकरणे बिघडणे असे प्रकारही घडत. ते टाळण्यासाठी या धाग्याचा वापर थांबविण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

यंदा पांडा मांज्याला मोठी मागणी आहे. १२ तार व ९ तार अशा दोन प्रकारांत हा मांजा उपलब्ध आहे. एका रिळाची किंमत १५० ते ४५० रुपये आहे. हा मांजा जाड आणि रंगीबेरंगी असतो. यात बरेली मांज्याला किंवा साध्या धाग्याच्या मांज्याला कापण्याची क्षमता असते. बरेली मांजा ५० ते २०० रुपयांना उपलब्ध आहे. बरेली धागाही आकर्षक आणि मजबूत असतो. नवरंगी पांडा मांजादेखील बाजारात आला आहे. लहान मुलांचे बोट कापू नये म्हणून कॉटन मांजा, गोधडीचा धागा याला ग्राहक पसंती देत आहेत.

प्लास्टिकचे आणि कागदी पतंग, मोठे आणि वेगवेगळ्या आकारांतील चिनी पतंग ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दोन रुपयांपासून तीनशे रुपयांपर्यंतचे पतंग उपलब्ध आहेत. यात मोदी आणि ओबामा यांची छायाचित्रे असलेल्या पतंगांना मोठी मागणी आहे. डायमंड, स्लेड काइट, बार्न डोअर काइट, डेल्टा काइट या आकारातही पतंग उपलब्ध आहेत. याशिवाय छोटा भीम, डोरेमॉन, बार्बी, सिनचॅन यांसारख्या कार्टुन्सची छबी असलेले पतंग मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. कागदाची किंमत वाढल्यामुळे कागदी पतंगांच्या किमतीत सुमारे २५ टक्के वाढ झाली आहे.

नायलॉन मांज्यावरील बंदी योग्यच आहे. त्यामुळे पक्षी आणि लहान मुलांना होणाऱ्या इजा टाळता येतील. चिनी पतंगांवरही बहिष्कार टाकणे आवश्यक आहे. तसे झाल्यास संक्रांतीचा गोडवा अधिक वाढेल.

राजेश दौडकर, पक्षीप्रेमी

नायलॉन मांज्यावर बंदी आणण्याचा राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्हच आहे. हा मांजा झाडाच्या फांद्यांमध्ये अडकून राहतो. त्यात पक्षी अडकल्यास त्यांना तो तोडताही येत नाही. त्यातून सुटका करून घेण्याच्या धडपडीत पक्ष्यांना इजा होते. काही वेळा त्यांचा जीवही जातो. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन केले जाणे आवश्यक आहे.

अर्चना देसाई, पक्षीप्रेमी

पतंग उडविण्यासाठी मांज्याचा वापर केला जातो. नायलॉनच्या मांज्यावर बंदी आली हे चांगलेच झाले. या धाग्यांत गुंतून पक्ष्यांची हाडे फ्रॅक्चर होतात. काहीवेळा त्यांना अपंगत्व येते. आमची संस्था अशा पक्ष्यांवर उपचार करते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली की त्यांना सीबीडी सेक्टर-९ येथील व्हॅली पार्कमध्ये सोडून दिले जाते. पतंग उडवताना कोणताही धागा हवेत सोडून देणे टाळलेच पाहिजे.

प्रीतम भुसाणे, पक्षीअभ्यासक, सिटी ट्रेकर्स पक्षी मित्र संघटना