20 January 2019

News Flash

किवीचा हंगाम सुरू

ग्रिसहून आयात केल्या जाणाऱ्या किवीलाही भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

ग्रिसहून आयात केल्या जाणाऱ्या किवीलाही भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे

एपीएमसीत ड्रॅगन फ्रूट, सफरचंदांचीही आवक

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात परदेशी फळांची आवक सुरू झाली आहे. ड्रॅगन फ्रूट, किवी, सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे.

परदेशी फळांना भारतीय बाजारपेठेत मागणी आहे. ड्रॅगन फ्रूट मूळचे थायलंड आणि चीनमधील आहे, मात्र भारतीय बाजारपेठेतून या फळाला असलेली वाढती मागणी विचारात घेऊन स्थानिक शेतकऱ्यांनी येथे या फळाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. साधारणत: दिवाळीच्या सुमारास स्थानिक ड्रॅगन फ्रूट एपीएमसी बाजारात दाखल होते. आता त्यांचा हंगाम संपत आला असून व्हिएतनाममधून आयत सुरू झाली आहे. चार-पाच वर्षांपूर्वी भारतात एपीएमसीमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या आयतीला सुरुवात झाली. काही आजारांवर हे फळ परिणामकारक असल्याच्या चर्चेमुळे त्याची मागणी वेगाने वाढली. सध्या बाजारात दोन ते अडीच हजार पेटय़ा ड्रॅगन फ्रूट दाखल होत आहे. २० ते २२ नगांना ५०० ते ७०० रुपये भाव मिळत आहे.

ग्रिसहून आयात केल्या जाणाऱ्या किवीलाही भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. एपीएमसीमध्ये हे फळ दाखल झाले आहे. बाजारात सध्या २ हजार पेटय़ा आयात होत आहेत. १०० नगांना हजार रुपये तर व्यवस्थित पॅकिंग केलेल्या पेटीतल्या ६० नगांना ७०० रुपये बाजारभाव आहे.

शिमला, जम्मू-काश्मीरमधील सफरचंदांची आवक आता कमी झाली असून अमेरिकेतील वॉशिंग्टनहून आयात केलेल्या सफरचंदांची आवक सुरू झाली आहे. बाजारात रोज एक कंटेनर दाखल होत असून त्यामध्ये १० ते २० किलो वजनाच्या एक हजार १०० पेटय़ा असतात. घाऊक बाजारात २० किलोच्या पेटीला दोन हजार ५०० ते २ हजार ७०० रुपये तर १० किलोच्या पेटीला  १३०० ते १४०० रुपये बाजारभाव आहे. शिमल्यातील सफरचंदाच्या १४-१६ किलोच्या पेटीला ५०० ते ८०० रुपये भाव मिळतो.

एपीएमसीमध्ये नोव्हेंबरपासून नागपूरच्या गावठी मोसंबी आणि संत्र्यांचा हंगाम सुरू होतो. या गावठी फळांचा हंगाम आता संपला असून राजस्थानमधील किन्नो संत्री आणि मद्रासमधील मोसंबी मोठय़ा प्रमाणात बाजारात दाखल होऊ लागली आहेत.

मद्रासची मोसंबी आकारने मोठी व आंबट असतात तर नागपूरची मोसंबी लहान व गोड असतात. मद्रासची मोसंबी ज्यूससाठीच वापरली जातात. राजस्थानची किन्नो संत्री मोठी व आंबट- गोड असतात. घाऊक बाजारात ४-५ डझन किन्नोला ३०० ते ४५०रुपये तर नागपूरच्या संत्र्याला ८ डझनामागे ६०० ते १००० रुपये भाव आहे.

अंजीर, द्राक्षांचीही आवक वाढली असून १०-१५ किलो काळ्या द्राक्षांना ७०० ते ९०० रुपये दर मिळत आहे. पिवळ्या द्राक्षांना ५०० ते ६५० रुपये बाजरभाव आहे.

First Published on February 7, 2018 4:11 am

Web Title: kiwi fruits arrivals in navi mumbai apmc market