News Flash

पाऊले चालती.. : चालण्यातून मिळणारं औषध

धारणतलाव हा चालण्यासाठीचे औषध बनला आहे आणि चालण्या-धावण्यातून औषध देत आहे.

धारणतलाव कोपरखरणे सेक्टर-१९

रोज धिमं चालायचं, निव्वळ चालायचं, गडबडघाईत चालायचं. कधी तरी थोडं जोरात चालायचं. त्याहून जोरात चालायचं. कधी तरी धावायचं आणि एखादा दिवस असा येतो की जोरात धावायचं. अगदी छाती फुटेस्तोवर. या प्रत्येक प्रकारात सकाळी-सकाळी शरीराला व्यायाम देण्यासाठी कोण ना कोण तरी बाहेर पडत असतो; पण कोपरखैरणे सेक्टर-१९ मधील धारणतलावावर चालण्या-धावण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला निळ्याशार आकाशाचे प्रतिबिंब पडलेल्या पाण्याची सोबत असते. इथल्या चालण्याला वेगळाच तरंग आणि ताल येतो.. धारणतलाव हा चालण्यासाठीचे औषध बनला आहे आणि चालण्या-धावण्यातून औषध देत आहे.

कालपरवापर्यंत ठाणे जिल्हा हा जास्त क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा होता. या जिल्ह्य़ाचे विभाजन होऊन नंतर पालघर जिल्हा अस्तित्वात आला. अशा या जिल्ह्य़ाचे प्रमुख शहर ठाणे हे तलावांचे शहर म्हणून नावाजलेले आहे. या ठाणे जिल्ह्य़ातच येणारी नवी मुंबईही असे तलाव घेऊनच नटली आहे. कोपरखरणे खाडीच्या परिसराचा विकास करण्यासाठी मातीचा भराव (रिक्लेमेशन) तयार केला जात असताना ‘नागरीकरणा’च्या कचाटय़ातून धारणतलाव सुटला आणि कोपरखैरणेतील रहिवाशांसोबत निसर्ग कायमचा सोबतीला आला.

पाच वर्षांपूर्वी या तलावाचा कायापालट करण्यात आला. तलावाभोवती वनराई आहे. नेहमीच्या ‘धुरांडी’ आयुष्यातून २४ तासांमधील काही वेळ शरीराला देण्यासाठी इथे बलोपासना करतात. याआधी धारणतलावाच्या बाजूला कोणी फिरकतही नव्हते. कारण तलावाच्या सुशोभीकरणात दिरंगाई झाल्याने या परिसराला बकाल स्वरूप आलेले होते. आता स्थिती पूर्ण बदलली आहे.

पालिकेने या तलावाचे सुशोभीकरण केले आहे. तलावाच्या बाजूने एक किलोमीटर अंतराचा ‘जॉगिंग ट्रॅक’ बनविण्यात आला आहे. चालणाऱ्याला वा धावणाऱ्याला पूर्ण सपाट जागा मिळेल, अशी दर्जेदार लाद्यांची रचना आहे. तलावाच्या एका बाजूला कांदळवन आहे. तर दुसऱ्या बाजूला उद्यान आहे. पहाटे पाचपासून ‘वॉक’साठी अनेक जण येतात. पक्ष्यांची संगत हा येथील विरंगुळ्याचा भाग आहे. त्यांना विविध प्रकारचे खाद्य आणून टाकायचे आणि अन्नदानात वेळ घालवायचा असा काही ज्येष्ठ नागरिकांचा शिरस्ता आहे. पक्ष्यांचा ते खाण्यासाठीचा धीटपणाही अनेकांचा उत्साह वाढवणारा असतो.

थंडीचा काळ हाही उत्साहवर्धकच. योग आणि व्यायामांतील आनंद त्यामुळे वाढलेला असतो. धारणतलावावर खुली व्यायामशाळा आहे. सध्या ही व्यायामशाळा तुटलेल्या उपकरणांमुळे बंद आहे. सायंकाळी कोपरखरणे आणि घणसोलीतील नागरिक तलावाकाठी येतात. पावसाळ्यात मात्र येथे येणाऱ्यांच्या संख्येला ओहोटी लागलेली असते.

चालण्याला भरपूर जागा आहे; परंतु सध्या तलावातील पाण्याचे आरोग्य बिघडले आहे. तलावात निर्माल्य टाकण्यात येत असल्याने पाणी दूषित होत आहे. काही नागरिक त्यामुळे नाराज आहेत. तलावाशेजारी प्रसाधनगृह बांधण्यात आले आहे. मात्र त्याचा वापर अद्याप करण्यात आलेला नाही.

तिन्ही ऋतूंमध्ये सकाळी येऊन अर्धा ते पाऊण तास चालल्याने दिवस उत्साहात जातो.

दीपिका महेंद्रकर, विद्यार्थिनी

 

चार वर्षांपासून मी येथे येते. आता माझ्या खात्यात चार मैत्रिणींची भर पडली आहे. आम्हा सर्वाचा २५ जणांचा गट आहे. या मैत्रीशिवाय करमत नाही. यातून व्यायामाची गोडी वाढली आहे. खरे तर दिवसाला निघणारी ही छोटीशी पिकनिकच आहे.

गीता नायर , महिला

मधुमेहावर चालणे हे माझे औषध आहे. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे प्रमाण कमी झाले आहे.

राधाबाई गोरे, ज्येष्ठ महिला

शहरातील कोंदट वातावरणापेक्षा मोकळ्या अशा वातावरणात फिरल्यावर दिवसभर प्रसन्न वाटतं. खुल्या व्यायामशाळेत रग जिरवायची इच्छा आहे. तेवढी व्यवस्था येथे झाल्यास मजा येईल.

अमित जाधव, नागरिक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 12:41 am

Web Title: kopar khairane dharan lake
Next Stories
1 नाका कामगारांच्या कमाईवर डल्ला
2 डी. वाय. पाटील रुग्णालयाचा परवाना रद्द
3 लोकप्रतिनिधींना विकासाचे वावडेच!
Just Now!
X