तांत्रिक अडचणीमुळे रुग्णालयासाठी खासगी इमारत घेणेही अशक्य

कोपरखरणे येथील माता-बाल रुग्णालयाची नागरिकांना आणखी काही वर्षे प्रतीक्षाच करावी लागणार आहे. पर्याय म्हणून रुग्णालयासाठी येथील एक खासगी तयार इमारत घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र तांत्रिक अडचणींमुळे ती इमारत घेणे शक्य नसल्याने मंजूर प्रस्ताव रद्द करण्यासाठी महासभेकडे पाठविण्यात आला आहे.

कोपरखैरणे येथील नागरिकांना माता-बाल रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कोपरखैरणे परिसरात माता-बाल रुग्णालयाचा प्रश्न अडगळीत पडला होता. यावर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासनाने न्यूक्लीअर हेल्थकेअर लि. या कंपनीच्या मालकीची से.२३ येथील तयार इमारत एकूण ३६ कोटींना खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. परंतु आता हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी महासभेकडे पाठवला असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. काही सुधारणा सुचवून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. तत्कालीन आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्या कार्यकाळात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्या वेळी झालेल्या स्थायी समितीमध्ये जुन्या इमारतीच्या जागी नवीन बांधकाम करण्यासाठी ४५ कोटी रुपयांचा खर्च होता तर ही तयार इमारत २९ कोटी व अंतर्गत फर्निचर करिता ६ कोटी असे मिळून ३६.२० कोटींचा खर्च येत आहे, त्यामुळे ही इमारतखरेदी आवाक्यात असल्याचे सांगण्यात आले व हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, परंतु आता हा प्रस्ताव रद्द करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या खासगी इमारतीमध्ये रुग्णालयाच्या दृष्टीने योग्य इमारत नसल्याची बाब समोर आली असून याबाबत अभियंता, मालमत्ता व आरोग्य विभागानेही ही इमारत घेण्याबाबत नकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, कोपरखैरणे सेक्टर २२ येथील माता-बाल रुग्णालयाची इमारत तोडून त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात तीन मजल्यांची इमारत बांधण्याचा ८ कोटी ५ लाख २७ हजार ३६० रुपये खर्चाची इमारत बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खासगी इमारत खरेदी करण्याचा प्रशासनाने पाठवलेल्या प्रस्तावाबाबत महासभेत उलटसुलट चर्चेला उधाण येणार आहे.

महापालिकेने नुकताच जुन्या माता-बाल रुग्णालयाच्या ठिकाणी नवी इमारत बांधण्याच्या फेज एकमधील कामाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या इमारतीचे काम लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. – अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त. नवी मुंबई</strong>