|| पूनम सकपाळ

वाहतुकीसह पाणी, वीज, आरोग्याचे प्रश्न

नवी मुंबई : कमी दाबाने पाणीपुरवठा, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी, गटारांची क्षमता संपल्याने रस्त्यावर येणारे सांडपाणी.. हे नियोजित नवी मुंबईतील कोपरखरणे या उपनगरातील चित्र असून सर्वच बाबतीत नागरिकांची ‘कोंडी’ होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या विभागात इतर अनेक समस्यांबरोबर वाहतूक कोंडी ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. रेल्वे स्थानकाबाहेर एकमेव ‘पे अँड पार्क’ची व्यवस्था आहे. इतर कुठेही वाहनतळ उपलब्ध नसल्याने वाहने उभी करण्याची हक्काची जागा म्हणजे रस्ते व उद्याने. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांबरोबर ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी करतात. त्यामुळे आधीच अरुंद रस्ते निमुळते होऊन प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. कोपरखैरणे सेक्टर २२ येथून हॉटेल ब्ल्यू डायमंड ते कोपरखैरणे तीन टाकीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी असतात. तीनटाकी ते सेक्टर-१५ च्या रस्त्यावर नेहमीच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. कोपरखैरणे बस स्थानक, माथाडी रुग्णालय परिसरातदेखील वाहनांची पार्किंग होत असते. त्यामुळे वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांसह नागरिकांना त्रासाचे होत आहे.

या भागातील मलनि:सारण वाहिन्या तसेच सिडको वसाहतीतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजीचा सूर आहे. सिडको वसाहतीत गरजेपोटी अनेक बेकायदा बांधकामे झाली आहेत. त्यामुळे नियोजित लोकसंख्येच्या तीन ते चारपट लोकसंख्या वाढली आहे. मात्र पायाभूत सुविधांची क्षमता तेवढीच असल्याने मलनि:सारण वाहिन्या भरून वाहत आहेत. सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. वसाहतीअंतर्गत विकासकामे करण्याची मागणी होत आहे, मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

पालिका रुग्णालय कधी?

कोपरखैरणे विभागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेली अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित आहे. येथील रुग्णांना बोनकोडे येथील नागरी आरोग्य केंद्रात, तर गरोदर महिलांना वाशी येथील माता-बाल रुग्णालयात जावे लागत आहे. सेक्टर २२ येथील माता बाल रुग्णालय बंद असल्याने ही गैरसोय होत आहे. या रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

गवळीदेव पर्यटन विकास अधांतरीच

अडवली भुतवली येथील गवळीदेव डोंगर आहे. येथील धबधब्यावर पावसाळ्यात नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरांतून पर्यटक येत असतात, त्यामुळे पालिकेने हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून घोषित केला आहे.  मात्र या परिसराच्या विकासाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी शौचालयाची सुविधा नाही. गवळीदेव डोंगराचा पर्यटन विकास कधी होणार? असा सवाल केला जात आहे.

प्रभागांच्या समस्या टँकरद्वारे पाणीपुरवठा

प्रभाग क्रमांक २६ मध्ये अडवली, भुतवली, महापे, सुलाईदेवी, संभाजीनगर, हनुमान नगर, गवळीदेव डोंगर हा भाग येतो. सुलाईदेवी येथे पाण्याची समस्या गंभीर आहे. एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होता, मात्र तो अपुरा व अवेळी असतो. नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. या भागातील नागरिकांना तीन ते चार किलोमीटर दूरवर अंत्यविधीसाठी जावे लागत आहे. येथील स्मशानभूमीची मागणी प्रलंबित आहे. आदिवासींसाठी घरकुल योजनेचा लाभ मिळत असल्याने त्याबाबत नागरिक समाधानी आहेत.

रस्त्यावर सांडपाणी

प्रभाग ३७ मध्ये सेक्टर १, ४, १अ, २अचा परिसर येतो. हा भाग सिडको वसाहतीतील असून कंडोनियमअंतर्गत मलनि:सारण वाहिन्यांची कामे तसेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. गटारांची स्वच्छता होत नसल्याने पावसाळ्यात सांडपाणी वसाहतीत शिरते. भूखंडच शिल्लक नसल्याने बहुउद्देशीय इमारत, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र तसेच सांस्कृतिक भवनसाठी जागाच उपलब्ध नाही. भूखंड क्रमांक ३७ येथे बहुउद्देशीय इमारतीची मागणी होत आहे. कोपरखैरणे ते घणसोली पादचारी पुलाचे काम प्रस्तावित आहे. याच प्रभागात पालिकेने अग्निशमन केंद्र उभारले आहे. प्रभाग ३८ मध्ये सेक्टर २, ३ चा भाग येत असून वसाहतीअंतर्गत कामे झालेली नाहीत. दैनंदिन बाजाराचे नियोजन असून तो अद्याप सुरू झालेला नाही.

गावात वीज समस्या

प्रभाग क्रमांक ३९ मध्ये सेक्टर १९, २० व प्रभाग ४०, ४१ मध्ये कोपरखैरणे गाव येते. गावात प्रामुख्याने विजेची समस्या आहे. सिडकोकालीन वीजवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. बहुउद्देशीय इमारत, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची कमतरता आहे.

नवीन वीजवाहिनी जोडणी

प्रभाग क्रमांक ४२ मध्ये सेक्टर २२, २३, १६ व १७ चा काही भाग येतो. या भागातही विजेची मोठी समस्या काही अंशी सुटलेली आहे. सेक्टर १६ येथे नवीन वीजवाहिनी जोडणी करण्यात आली आहे. मलनि:सारण वाहिन्यांबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर कामे सुरू झाली आहेत. प्रभाग क्रमांक ४३ मध्ये सेक्टर १७, १८ हा भाग येतो. या वसाहतीत कंडोनियमअंतर्गत कामे रखडली आहेत. रस्त्याची कामे लवकरच सुरू होतील, असे पालिका प्रशासनाने सांगितले.

फेरीवाल्यांमुळे गैरसोय

प्रभाग ४४ मध्ये सेक्टर ७, १६ व १५ येते. या वसाहतीत फेरीवाले व वाहन पार्किंग ही गंभीर समस्या आहे. सेक्टर १५ येथे दैनंदिन बाजाराचे काम सुरू आहे. गुलाब डेअरी ते उद्यानापर्यंतच्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी ताबा घेतला आहे. रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले बसलेले असतात, त्यामुळे या रस्त्यावरून चालणेही अवघड होत आहे. डीमार्ट चौकातही नेहमी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे पादचारी पुलाची मागणी होत आहे. प्रभाग ४५ मध्ये उद्यान व मैदान आहेत.

निसर्ग उद्यानाचा ‘श्वास’

विविध समस्यांनी श्वास कोंडलेल्या कोपरखरणेतील नागरिकांना श्वास घेण्याचे एकमेव ठिकाण आहे ते निसर्ग उद्यान. या ठिकाणी नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असून येथील सुविधांबाबत समाधान व्यक्त होत आहे. सकाळ, संध्याकाळ या ठिकाणी नागरिकांची गर्दी असते.

विद्यमान नगरसेवक

प्रभाग क्रमांक २६ :  रमेश डोळे (भाजप)

प्रभाग क्रमांक ३७ : सायली शिंदे (भाजप)

प्रभाग क्रमांक ३८ :  मेघाली राऊत (शिवसेना)

प्रभाग क्रमांक ३९ :  अनिता पाटील (शिवसेना)

प्रभाग क्रमांक ४० :  शिवराम पाटील (शिवसेना)

प्रभाग क्रमांक ४१ :  छाया म्हात्रे (भाजप)

ल्ल प्रभाग क्रमांक ४२ :  देवीदास हांडेपाटील (भाजप)

प्रभाग क्रमांक ४३ :  दमयंती आचरे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक ४४ :  भारती पाटील (भाजप)

प्रभाग क्रमांक ४५ :  संगीता म्हात्रे (भाजप)

अडवली भुतवली येथील समस्या मार्गी लागल्या आहेत. सार्वजनिक शौचालय आहे. पाण्याची टाकीदेखील उपलब्ध आहे. मात्र ही टाकी वेळोवेळी स्वच्छ केली जात नाही. प्रभागात धूर फवारणी होत नाही.

– चिमा दूनदे

रखडलेल्या मलनि:सारण वाहिन्यांचे काम सुरू होत आहे, हे दिलासादायक आहे. या भागात एखादे ग्रंथालय किंवा वाचनालय व्हावे, ही अपेक्षा.

– अनिल वारे

कोपरखैरणे विभागात पार्किंग समस्या गंभीर आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असते. रेल्वे स्थानक परिसरात हा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. महापालिकेने यावर लवकर तोडगा काढावा.

– विशाल गुंजाळ