उद्यान विभागाकडे हस्तांतर न झाल्याची सबब

कोपरीमध्ये महापालिकेने उभारलेल्या मनोरंजन उद्यानाचे काम पूर्ण झाले असून, ते उद्घाटनाअभावी बंद आहे. पावसाळ्यात उद्यान बंद राहिल्यास तेथील मनोरंजनाची साधने खराब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप हस्तांतर न झाल्यामुळे उद्घाटन करण्यात आलेले नाही, असे कारण उद्यान विभागाने दिले, तर उद्यानाचे काम पूर्ण झाले असून त्याचा प्रस्ताव उद्यान विभागाकडे सुपूर्द केल्याची माहिती प्रकल्प अभियंत्यांनी दिली.

नेरुळ येथील ‘वंडर्स पार्क’प्रमाणे कोपरीमधील मनोरंजन उद्यानही परिसरातची ओळख ठरणार असल्याची चर्चा आहे.

उद्यानाचे काम पूर्ण होऊन एक महिना लोटला तरी त्याचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. सव्वाचार कोटी रुपये खर्च करून हे उद्यान साकारण्यात आले आहे.

२० फूट लांब आणि १५ फूट उंच कासवाची प्रतिकृती हे या उद्यानाचे खास वैशिष्टय़ आहे. ही उंच प्रतिकृती सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. ठाणे-बेलापूर रस्ता आणि पामबीच रस्त्याला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरून प्रवास करताना उद्यान व आतमधील कासवाची प्रतिकृती पाहून अनेकांची पावले उद्यनाकडे वळू लागली आहेत, मात्र अद्याप उद्घाटन न झाल्याने नागरिक निराश होत आहेत.

संबंधित प्रकल्पाच्या अभियंत्याकडून अम्युझमेंट पार्कचे हस्तांतर अद्याप उद्यान विभागाकडे झालेले नाही. याचे उद्घाटन उद्यान विभागाकडे होताच करण्यात येईल.

तुषार पवार, अधिकारी, उद्यान विभाग, नवी मुंबई महानगरपालिका