अनामत रकमेत ४०० टक्क्यांची वाढ : परवाना शुल्क सरसकट पाच हजार रुपये
जून महिन्यात कामगार कायद्यात केलेल्या नवीन दुरुस्तीमध्ये मजूर कंत्राटदाराचे परवाने ऑनलाइन केले आहेत. या पद्धतीमुळे मजूर कंत्राटदाराचा परवाना आता सात दिवसांत कंत्राटदाराला मिळणार आहे. मात्र या परवान्यासाठी शुल्क व अनामत रकमेत सरकारने तब्बल चारशे टक्क्यांची वाढ केली आहे. कंत्राटदाराच्या या वाढीव सरकारी शुल्कामुळे व त्या रकमेच्या वसुलीसाठी पुन्हा सामान्य कंत्राटी कामगारांचे शोषण होण्याची भीती निर्माण झाली आहे. ऑनलाइन परवाना पद्धत असल्याने यानंतर परवाना नूतनीकरणासाठी कोणताही भ्रष्टाचार होणार नसल्याचा दावा रायगड जिल्ह्य़ाचे कामगार उपायुक्त शाम जोशी यांनी केला आहे. सात दिवसांत या विभागाने कंत्राटदाराला कोणताही प्रतिसाद न दिल्यास संबंधित कंत्राटदाराला परवाना बहाल केल्याचे मानण्यात येईल, अशीही तरतूद या ऑनलाइनपद्धतीमध्ये केली असल्याचे जोशी यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्य़ामध्ये एक हजार १७२ मजूर कंत्राटदार आहेत. तळोजा, पनवेल, पाताळगंगा, उरण, महाड, रोहा अशा मोठय़ा औद्योगिक क्षेत्रामध्ये लाखो कंत्राटी कामगारांचे जाळे पसरले आहे. कंत्राटदारांच्या माध्यमातून सध्या कायमस्वरूपी कामगारांना पर्याय म्हणून कंत्राटदार व कंत्राटी मजूर कारखानदारांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.
कंत्राटी कामगारांचे मूलभूत हक्क कंत्राटदार मारत असल्याने सामान्य कामगारांच्या जिवावर कंत्राटदार गब्बर होत असल्याचे कामगार विभागाच्या ध्यानात आल्यावर कंत्राटदार परवान्यात बदल करण्यात आले. कंत्राटदारांकडून कामगार विभागातील बडे अधिकारी परवाना नूतनीकरणासाठी आर्थिक चरीमिरी होत होती ती मिटविण्यासाठी कामगार विभागाने १० जूनला कायद्यात दुरुस्ती करून ऑनलाइन पद्धतीचा स्वीकार केला. या पद्धतीमुळे कंत्राटदारांनी परवाना नूतनीकरणासाठी कामगार कार्यालयात न येता स्वताच्या कार्यालयातून अर्ज करता येणार आहेत. माझे सरकार, एलएमएस.महाऑनलाइन आणि महाराष्ट्र.गव.इन या वेबसाइटवर हे अर्ज मिळू शकतील. या अर्जासाठी कंत्राटदाराने कागदपत्रे स्कॅन केल्यानंतर अवघ्या सात दिवसांत हा परवाना मिळणार आहे. यापूर्वी वीस कामगारांसाठी परवाना शुल्क शंभर रुपये होते. सध्या या परवाना शुल्कात सरसकट वाढ केलेली आहे. २० ते चारशे कामगारांपर्यंत पाच हजार रुपये आकारले जाणार आहेत. हे शुल्क एका वेळीच भरावे लागणार आहे.
परवान्याच्या नूतनीकरण होत असताना अनामत रकमेत तब्बल चारशे टक्क्यांच्या वाढीमुळे कामगार विभागाच्या तिजोरीत लाखो रुपये जमा होणार आहेत. परवाना नूतनीकरणाच्या अर्जासाठी ३० ऑक्टोबर ही अंतिम तारीख विभागाने जाहीर केली आहे. त्यानंतर तब्बल दीडपट परवाना शुल्क घेण्याची तरतूद कामगार विभागाने केली आहे.
रायगड जिल्ह्य़ातील ७४ हजार दुकान परवाने ऑनलाइन झाले आहेत. महाईसेवा केंद्रातून हे परवाने नूतनीकरण करता येणार आहे. सरकारच्या ऑनलाइन पद्धतीमुळे इन्स्पेक्टर राज संपेल अशी अपेक्षा आहे. नवीन परवाना काढण्यासाठी तब्बल पाच हजार रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे पनवेल येथील कामगार विभागाचे कार्यालय भ्रष्ट कारभारामुळे बदनाम झाले होते. ऑनलाइनपद्धतीमुळे सात दिवसांत दुकानांचा परवाना दुकानमालकांना घरबसल्या मिळवता येईल. ज्यांना संगणकाची माहिती नसल्यास रायगड जिल्ह्य़ातील १२८ महाइसेवा केंद्राच्या साह्य़ाने मालकवर्ग शॉपअ‍ॅक्टसाठी अर्ज करण्याची सोय कामगार विभागाने केली आहे. रायगड जिल्ह्य़ातील ७४ हजार शॉपअ‍ॅक्ट परवान्यांपैकी ५१ हजार पाचशे परवानाधारक पनवेल तालुक्यातील आहेत. सर्वाधिक महसूल या विभागाला पनवेल तालुक्यातून असूनही या विभागाचे कामकाज अनेक वर्षांपासून भाडय़ाच्या जागेतून चालते.

BJP, online advertisements, Phir Ek Bar,
‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च, ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…
TCS Recruitment 2024
TCSमध्ये होणार पदवीधर उमेदवारांची भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख अन् प्रक्रिया
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ