|| पूनम धनावडे

मोडकळीस आलेल्या घरात संसार

नवी मुंबईतील आदिवासी पाडय़ांवरील नागरिक आजही मोडकळीस आलेल्या व डागडुजी केलेल्या झोपडीवजा घरांत आपले जीवन कंठत आहेत. मात्र जागेअभावी पालिका त्यांना साधे घरकुलही पुरवू शकत नाही.

नवी मुंबई शहर हे स्मार्ट सिटी म्हणून नावारूपाला येत असून विकसित शहरांच्या यादीत मोडत आहे. मात्र येथील आदिवासी पाडे आजही मूलभूत सुविधांपासून वंचितच असल्याचे चित्र आहे. काही आदिवासी पाडे सुधारित यादीत मोडत आहेत, तर काही निवाऱ्यापासून वंचित आहेत.

नवी मुंबईत महापालिकेच्या यादीत आठ प्रभागात ३ ते ४ चार असे एकूण १९ आदिवासी पाडे आहेत. येथील लोकसंख्या ४ हजारांच्या घरात आहे. येथील आदिवासींनी त्यांच्या पात्रतेनुसार राहणीमानात बदल करून घेतला आहे. मात्र आजही काहीजण मोडकळीस आलेल्या घरात डागडुजी करून दिवस काढत आहेत, तर काहीजण पूर्ण पडलेले घर सोडून पत्र्याचे शेड उभारून राहात आहेत.

राबाळे येथील कातकरी पाडा हा सन १९३२ पासून आहे. या भागातील आजूबाजूच्या वस्तीत बराच विकास झाला आहे. या पाडय़ात एकूण २०० ते २५० लोकसंख्या आहे. मात्र त्यांना आजही पक्के घर नाही. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात राहत आहेत. घरकुल योजनेअंतर्गत घरे बांधून देण्यात आलेली नाहीत. येथे घरोघरी शौचालयदेखील उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. सीबीडी येथील ठाकूरवाडी पाडय़ातही घरकुल योजना पोहचलेली नाही.  या संदर्भात पालिकेचे समाजविकास विभागाचे उपायुक्त अमोल यादव यांनी सांगितले की, पालिकेकडे स्वत:ची जागा उपलब्ध नाही. त्यामुळे अडचणी आहेत. एमआयडीसीतील जागा मोकळी करून तेथील आदिवासींना श्रमिकनगर व वारली पाडा येथे एकूण २१३ घरे देऊन वसविले असल्याचे सांगितले.

गेली कित्येक वर्षांपासून या घरांत आम्ही राहात आहोत. मात्र आता हे घर मोडकळीस आलेले आहे. पावसाळ्यात कसेबसे दिसव काढावे लागत आहेत. नवीन घर बांधण्याएवढी ऐपत नाही.   -जाईबाई वाघे, आदिवासी, कातकरी पाडा

एमआयडीसीच्या जागेत काही जागा असल्याने अडचणी येत आहेत. घरकुल योजनेसाठी पालिकेने आर्थिक तरतूददेखील केली आहे, परंतु जागेचे हस्तांतर, इतर तांत्रिक बाबीसाठी शासन कमी पडत आहे. – सुधाकर सोनावणे, स्थानिक नगरसेवक, रबाळे