पाच बाजारपेठांमधील हजारो व्यापारी, कामगारांची परवड

नवी मुंबई : अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू असलेल्या नवी मुंबईतील पाच घाऊक बाजारपेठेतील सुमारे पंधरा ते सोळा हजार दैनंदिन व्यापारी व इतर घटकांच्या सेवेसाठी बाजार समितीची एकही रुग्णवाहिका नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या बाजारात चाचणी झालेल्या नागरिकांना रुग्णालयात जाण्यासाठी तीन ते चार तास केवळ रुग्णवाहिकेची वाट पाहावी लागत आहे. बाजार समितीची स्वत:ची अशी रुग्णवाहिका नाही पण आवश्यक वाटल्यास कोपरखैरणे येथील माथाडी रुग्णालयाची रुग्णवाहिका बोलावली जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

नवी मुंबई तुर्भे येथील पाच घाऊक बाजारपेठांची एपीएमसी बाजारपेठ ही अशिया खंडातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ मानली जाते. राज्य सरकारने सध्या अंशत: टाळेबंदी केल्याचे चित्र आहे. यात अत्यावश्यक सेवा असलेले अन्नधान्य, भाजी, फळे, कांदा-बटाटा ही दुकाने व या दुकानांना पुरवठा करणारी एपीएमसी बाजारपेठ सुरू ठेवलेली आहे. त्यामुळे घाऊक बाजारपेठेत दिवसाला पंधरा ते सोळा हजार नागरिकांची वर्दळ सुरू आहे. यात साडेचार हजारांपर्यंत केवळ व्यापारीच आहेत. पहिली टाळेबंदी संपल्यानंतर परराज्यातील नागरिक पोटापाण्यासाठी पुन्हा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात माघारी परतले आहेत. यात नऊ ते दहा हजार नागरिक हे या घाऊक बाजारपेठेत कामाला आहेत. फळ बाजारात सध्या हापूस आंब्याचा बाजार जोरात असल्याने हापूस आंब्याचे वर्गीकरण आवक-जावक करण्यासाठी हे नागरिक मजूर मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. त्यांच्या खाण्या-पिण्याची तसेच राहण्याची व्यवस्था व्यापारी घाऊक बाजारातील आपल्या मोकळ्या जागेत करीत आहेत. त्यामळे काही ठिकाणी नीचे दुकान आणि उपर मकान असे चित्र आहे. त्यामुळे पाच घाऊक बाजारात २४ तास लोकांची वर्दळ सुरू आहे. हा व्यापार करताना करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे. या बाजारातील प्रत्येक घटक हा मुंबई, नवी मुंबई, ठाणे या आजूबाजूच्या क्षेत्रांत राहात असल्याने तो करोना संसर्गाचा मोठा प्रसारक ठरत आहे. फळ बाजारात नऊ कामगारांना करोनाची लागण झाली आहे.  एका साध्या रुग्णवाहिकेची सोय प्रशासनाने इतक्या वर्षांत केली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.